नांदेड : देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती इरवंतराव पाटील नरंगलकर यांचे निधन | पुढारी

नांदेड : देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती इरवंतराव पाटील नरंगलकर यांचे निधन

देगलूर; पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती इरवंतराव लिंगप्पा पाटील यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मंगळवारी (दि. २१) सकाळी त्यांचे निधन झाले.

हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांनी जीवनभर कार्य केले. ते पंचायत समितीचे प्रदीर्घकाळ म्हणजे १७ वर्ष (१९७२ ते १९८९) सभापती म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काही काळ काम केले. त्यानंतर भूविकास बँक, गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नरंगल सेवा सहकारी सोसायटी यासह अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

प्रारंभी ते समाजवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, बळवंतरावजी चव्हाण, गंगाधरराव कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घकाळ काम केले. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी थेट संबंध असणारे कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात परिचित होते.

इरवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नरंगल सेवा सहकारी सोसायटीला मराठवाड्यात सर्वोच्च स्थान होते. रासायनिक खताच्या इफको कंपनीकडून राज्यस्तरावरील पुरस्कारही नरंगल सेवा सहकारी सोसायटीला मिळाला होता. तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मानही करण्यात आला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली नरंगल सेवा सहकारी सोसायटी, नरंगल ग्रामपंचायत मध्येही मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली होती. तत्कालीन काळात नरंगल ग्रामसचिवालयाची देखणी वास्तु त्यांच्याच नेतृत्वाखाली उभी राहिली होती. त्यांच्याच नेतृत्वाखाली विद्यानिकेतन सोसायटी शिक्षण संस्था, श्री शरण शांती वर्धक शिक्षणसंस्था, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित आलुर, नरंगल, शेवाळा, मानूर इथे उभे केलेल्या विद्यालयातून अनेक विद्यार्थी ज्ञानार्जन करत असून येथून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी राज्य आणि देशपातळीवर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. वेळप्रसंगी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका ते नेहमी निभावत असत. ईरवंराव पाटील पाटील यांचे समाजाच्या उत्कर्षासाठी नेहमीच योगदान रहात आले असून सहकारातील तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्य दीपस्तंभा सारखे आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या निधनाने सहकाराबरोबरच तालुक्याच्या राजकारणातील पितामह असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

 मंगळवारी (दि. २१) सायंकाळी ७.३० वाजता नरंगल येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. अंतिम संस्कारास तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षातील पदाधिकारी,नेते,सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.

Back to top button