नांदेड : बाभळी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे बंद; रब्बी हंगामासाठी उपयुक्त पाणीसाठा | पुढारी

नांदेड : बाभळी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे बंद; रब्बी हंगामासाठी उपयुक्त पाणीसाठा

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे सर्व 14 दरवाजे आज (दि.29) बंद करण्‍यात  आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्रिस्तरीय समिती अधिकाऱ्यांच्या समक्ष हे दरवाजे खाले टाकण्यात आले. त्यामुळे भविष्यात रबी हंगामातील पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या बाभळी बंधाऱ्यात 332.20 मीटर पाणी पातळी होती. यावेळी पाणीसाठा 14.54 दशलक्ष घनमीटर म्हणजे  0.513 टीएमसी इतका होता, अशी माहिती कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे यांनी दिली.

या त्रिस्तरीय समितीत केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एन. श्रीनिवासराव, अप्पर  गोदावरी डिव्हिजनचे एम. चक्रपाणी, पोचमपहाड प्रकल्प तेलंगानाचे कार्यकारी अभियंता श्रीराम सागर, उपविभागीय कार्यकारी अभियंता (बाबळी पाटबंधारे उपविभाग उमरी) रवींद्र पोतदार यांचा समावेश होता.

यावेळी आर. के. मुक्कावार (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक), डी. एस. पांडे, गुडेवार, बंडेवार, विजय गुंजकर, जुनेद, जमादार विश्वंभर स्वामी, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. बाभळी बंधारा सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, सहसचिव जी. पी. मिसाळे, सुशीलकुमार टाकळीकर, अशोक येवतीकर, इबितवार, मोकली आदी उपस्थित होते.

दरम्यान, दरवाजे खाली टाकल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदी किनारी असलेल्या सखल भागात पाणी गेल्याने शेत जमीन पाण्याखाली जाते. पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच बंधाऱ्यापर्यंत खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button