जालना : अंबड तालुक्यात परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे नुकसान | पुढारी

जालना : अंबड तालुक्यात परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे नुकसान

सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीनसह, कपाशी, उडीद, तूर, बाजरी व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात सुखापुरी महसुल मंडळात रविवारी ६७ मिमी व अंबड मंडळात २१ मिमी पाऊस पडल्याने खरिपाच्या पिकांबरोबरच बागायती पिकांचेही  प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सुखापुरी महसूल मंडळासह तालुक्‍यात हजेरी लावली. पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनची कापणी करून त्याच्या विक्रीतून सण साजरा करायची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, ऐन सोंगनीच्या तयारीत असलेल्या सोयाबीन पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे.

ऑक्टोबर हिटमुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजेच कपाशी देखील लवकरच फुटला आहे. मात्र कपाशी वेचणीसाठी मजूरांची कमतरता असतानाच आता पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जास्तीच्या पावसाने यावर्षी खरीपांच्या पिकातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने ऐन सणासुदीच्या वेळीच शेतकरी अडचणीत सापडला आहे.

अंबड तालुक्यात सुरवातीला पावसाने खंड दिल्याने पेरणीला उशीर झाला. अधून मधून पडणाऱ्या जेमतेम पावसांवर खरीपाची पिके आली आहेत. मात्र परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पन्न घटणार आहे.
– दत्ता साळे, शेतकरी, रुई

हेही वाचा :

Back to top button