परभणी : इंद्रायणी नदीवरील पूल सातव्यांदा पाण्याखाली; ८ गावांचा संपर्क तुटला | पुढारी

परभणी : इंद्रायणी नदीवरील पूल सातव्यांदा पाण्याखाली; ८ गावांचा संपर्क तुटला

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सायळा (सुनेगाव) येथील इंद्रायणी नदीवरील पूल मागील दीड महिन्यात तब्बल सातव्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून सुनेगावसह ८ गावांचा संपर्क तुटला आहे. या पूलाची उंची वाढविण्यासाठी सातत्याने मागणी करूनही लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता नागरिक जनआंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

तालुक्यातील सूनेगाव (सायळा) गावातील इंद्रायणी नदीच्या पुरावरून जायकवाडी धरणाचे सोडलेले पाणी मोठ्या क्षमतेने वाहत आहे. परिणामी शनिवारी (दि.१७) सायंकाळपासून सायळा, सुनेगाव, मुळी, धारखेड, नागठाणा, माळसोन्ना, धसाडी, अंगलगाव या ८ गावांचा संपर्क तुटला आहे. मागील एक ते दीड महिन्यातील सातव्यांदा ही वेळ आली आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सायंकाळपासून पुलावरून पाणी वाहत असल्याने रविवारी दिवसभर पाणी पातळी वाढत असल्याने ग्रामस्थ आपला जीव मोठे घेऊन ये-जा करीत आहेत. पुलाची उंची वाढविण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सायळा ग्रामस्थ करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button