बीड : परळी औष्णिक विद्युत केंद्रातील चिमणी जमीनदोस्त (व्हिडिओ) | पुढारी

बीड : परळी औष्णिक विद्युत केंद्रातील चिमणी जमीनदोस्त (व्हिडिओ)

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी (जि. बीड) येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक तीनची धूरवाहक चिमणी आज (दि.१२) सकाळी जमीनदोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी ही एक चिमणी १२० फूट उंचीची होती.

मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे १९७१ मध्ये सुरू झाले. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आल्या होत्या. १९७१ पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण ८ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक, दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आयुर्मान संपल्यामुळे ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक तीनची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ३ एप्रिल १९७९ मध्ये सुरू करण्यात आला होता. हा संच आता संपूर्णतः बंद करण्यात आलेला आहे.

२०१० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक ३ चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅपमध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने २०१५ पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सन २०१९ पूर्वी हा संच स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी औष्णिक केंद्रातील ३० मेटाबॅटचे दोन संच स्क्रॅपमध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन, चार, पाच, हे तीन संच २०१९ पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक तीनची १२० फूट उंचीची चिमणी आज सोमवारी सकाळी पाडण्यात आली आहे. यावेळी विद्युत केंद्राच्या अधिकारी, सुरक्षा विभागाचे कर्मचारी, कन्स्ट्रक्शन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button