Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाची याचिका स्वीकारली, २२ सप्टेंबरला पुढील सुनावणी | पुढारी

Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाची याचिका स्वीकारली, २२ सप्टेंबरला पुढील सुनावणी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gyanvapi Masjid Case ज्ञानवापी मशिद प्रकरणी वाराणसी न्यायालयाने दाखल याचिकांवर आज निर्णय दिला. ज्ञानवापी संकुलात असलेल्या शृंगार गौरीच्या नियमित दर्शन-पूजेच्या प्रकरणावर जिल्हा न्यायाधीश न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षाचे अपील फेटाळून लावले. तर हिंदू पक्षाची याचिका स्वीकारत हे प्रकरण सुनावणीस योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. काशी विश्वनाथ धाम क्षेत्र-ज्ञानवापी परिसरात छावणीत रूपांतर झाले आहे.

26 पानांमध्ये न्यायालयाचा निर्णय

Gyanvapi Masjid Case प्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी मुस्लिम पक्षाचा अर्ज फेटाळून लावला. जिल्हा न्यायाधीशांनी सुमारे 10 मिनिटांत 26 पानी आदेशाचा निष्कर्ष वाचून दाखवला. या खटल्यात 1991 चा पूजास्थळ कायदा लागू होत नाही, असे न्यायालयाने म्हटले. शृंगार गौरी खटल्याचे उत्तरदायित्व दाखल करण्यासाठी आणि ऑर्डर 1 नियम 10 मध्ये पक्षकार होण्याच्या अर्जावर न्यायालय सुनावणी करेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. निकालावेळी मुस्लीम पक्ष न्यायालयात उपस्थित नव्हता.

काय आहे ज्ञानवापी प्रकरण

18 ऑगस्ट 2021 रोजी पाच महिलांनी ज्ञानवापी येथील शृंगार गौरीचे नियमित दर्शन-पूजन आणि विग्रहांच्या रक्षणासाठी याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार 16 मे 2022 रोजी ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी २३ मे २०२२ पासून जिल्हा न्यायालयात सुरू आहे.

ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणात स्वातंत्र्याच्या वेळी ‘धर्मस्थळ कायदा’ लागू होता की नाही यावर न्यायालय सुनावणी करत होते. आता न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला आहे. मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळताना न्यायालयाने ज्ञानवापीचे प्रकरण सुनावणीस योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे इथून पुढे ख-या अर्थाने मुख्य खटल्याला सुरुवात होईल. ज्यामध्ये ज्ञानवापी परिसर हिंदू पक्षाचा आहे की मुस्लिमांचा आहे हे ठरविले जाईल?

विशेष म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यासंदर्भात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये अर्धा डझनहून अधिक खटले प्रलंबित आहेत.

दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणावर आज सुनावणी होणार असल्याने सकाळपासूनच संपूर्ण काशी विश्वनाथ परिसरात पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोठेही, कोणताही अनुचित प्रकार होता कामा नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे.  ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त बॅरिकेड्स वाढवण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Indresh Kumar : ज्ञानव्यापी मशिदीचे सत्य लोकांसमोर आणा : इन्द्रेश कुमार

Gyanvapi Masjid survey : ज्ञानव्यापी मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग आढळले : हिंदू पक्षाच्‍या वकिलांचा दावा

Back to top button