परभणी : येलदरी धरण १०० टक्के भरले | पुढारी

परभणी : येलदरी धरण १०० टक्के भरले

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील येलदरी धरण आज शंभर टक्के तुडुंब भरल्याने समाधन व्यक्त होत आहे. पाण्याची पातळी आज घडीला 461.772 मीटर असून धरणात 934.440 दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरण भरले असले तरी अद्याप धरणाचे गेट सोडलेले नसल्याची माहिती सुपरवायझर एम. डब्ल्यू. खरात यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना दिली. मराठवाड्यातील दोन नंबरचे मोठे धरण म्हणून येलदरी धरणाची ओळख आहे. या धरणाचा परभणी जिल्ह्यासह हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी मोठा वापर केला जातो.

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेले खडकपूर्णा धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या खडकपूर्णा धरणाचे तीन वक्र गेट सोडलेले असल्याने तेथून पाण्याची आवक येलदरी धरणात होत आहे. 3000 क्यूसेक्सने पाण्याची आवक होत असून याचाच परिणाम सध्या येलदरी धरण 100 टक्के भरले आहे. पण सध्या तरी या धरणाच्या गेटद्वारे विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

येलदरी धरण भरल्याने विद्युत प्रकल्पाचे दोन जनित्र सुरू केले आहेत. त्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 22.5 मेगा वॅट वीजनिर्मितीसाठी 3 पैकी २ विद्युत प्रकल्पाचे जनित्र कार्यान्वित झालेली आहेत, अशी माहिती खरात यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button