बीडमध्ये ‘धूम’स्टाईलने बँक कर्मचाऱ्याकडील पैशांची बॅग पळवली | पुढारी

बीडमध्ये ‘धूम’स्टाईलने बँक कर्मचाऱ्याकडील पैशांची बॅग पळवली

बीड; पुढारी वृत्तसेवा : महिला बचत गटांची रक्कम जमा करुन बीडला येत असलेल्या आयडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्याकडी पैशांची पिशवी पाठीमागून आलेल्या अज्ञातांनी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी, (दि. २६ ऑगस्ट) सकाळी गेवराई – बीड महामार्गावर घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहे.

बीड येथील आयडीएफसी बँकेच्या शाखेतील कर्मचारी सुदर्शन शिवाजी वाघ (रा. माटेगाव, ता. बीड) हे नेहमी प्रमाणे पाचेगाव ( ता. गेवराई) येथून महिला बचतगटांची रक्कम वसूल करून ती शाखेत भरण्यासाठी बीड येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येत होते. गेवराई -बीड महामार्गावर पाडळसिंगी जवळ आले असता पाठीमागून एक दुचाकी आली. त्यावर दोघे जण होते. त्यांनी दुचाकी जवळ आणून पैशांची पिशवी हिसकावून घेऊन बीडच्या दिशेने धूम ठोकली. सदरील कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला परंतु चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. सदरील पिशवीमध्ये ९५ हजार ६१० इतकी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती पोलिसांना देताच गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय प्रफुल्ल साबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. लवकरच चोरट्यांचे मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. परंतु भरदिवसा व महामार्गावर लुटीची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

Back to top button