कॅन्सरवरील उपचारानंतर प्रकाश आमटेंची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज | पुढारी

कॅन्सरवरील उपचारानंतर प्रकाश आमटेंची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची प्रकृती आता सुधारली आहे. गेल्या अडीच महिन्यपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर कॅन्सरवरील उपचार सुरू होते. प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीविषयी त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की…

सप्रेम नमस्कार….

गेली अडीच महिने पुण्यात Dinanath Mangeshkar Hospital येथे कॅन्सरवरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली आहे. 5 केमोथेरपी ने काम केले आहे. आज हाताचे प्लॅस्टर काढले. केमोथेरपी सुरू असतांनाच खोलीत अडखळून पडल्याने मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याला आज दीड महिना झाला म्हणून प्लॅस्टर काढले. आज दवाखान्यात डॉक्टरांनी फॉलोअपसाठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. तो आनंद वेगळा आहे.

मधले काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्या साठी अतिशय खडतर गेले. 2 महिने सलग ताप आणि न्युमोनिया मुळे 9 किलो वजन कमी झाले आहे. असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर सारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो.
DMH मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याच मुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील.

आम्ही सर्व कुटुंबीय आपले खूप खूप आभारी आहोत.🙏🏻 पुण्यात 75 दिवस वास्तव्य असताना अनेकांनी विविध मार्गाने सहकार्य केले. लोभ असावा असाच कायम.

आपला नम्र,
अनिकेत आमटे

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे पुत्र आहेत. डिसेंबर १९७३ पासून ते पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

डॉ. आमटेंना २००२ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. तर २००८ मध्ये त्यांना पत्नी मंदाकिनी यांच्यासहन रेमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. प्रकाशवाटा, रानमित्र यासारख्या पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलं आहे.

आमटेंना कर्करोगाचं निदान झाल्याच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला होता. मात्र कोणीही फोन करून कुटुंबीयांना त्रास न देण्याची विनंती सुपुत्र अनिकेत आणि इतर सदस्यांनी केली होती. काही महिन्यांपूर्वी प्रकाश आमटेंना करोनाचीही लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

Back to top button