हिंगोली : मोबाईलची रेंज येत नसल्याने चक्क गाव स्थलांतर करण्याची मागणी | पुढारी

हिंगोली : मोबाईलची रेंज येत नसल्याने चक्क गाव स्थलांतर करण्याची मागणी

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा : वडगाव तर्फे जवळा तालुका कळमनुरी या गावांमध्ये मोबाईलचे नेटवर्क येत नसल्याने गावकऱ्यांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातसुद्धा केवळ टॉवर नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा व इतर ऑनलाईन कामे सर्वच बंद आहे. कोणत्याही तातडीच्या घटनेची माहिती प्रशासन अथवा पोलिसांना देता येत नसल्याचे गावकऱ्याचे म्हणणे असून एकीकडे डिजिटल इंडिया करण्याचे स्वप्न पाहता, या गावची व्यथा ऐकल्यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

वडगाव तर्फे जवळा तालुका कळमनुरी येथील गावामध्ये इतर सुविधांचा अभाव आहे. रस्ते आणि मूलभूत सुविधा मिळण्यापासून गाव वंचित असल्याचे ग्रामपंचायतीच्या घेतलेल्या ठरावावरून दिसते आहे. नुकतेच या गावकऱ्यांनी जिल्हा अधिकारी हिंगोली व कळमनुरी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये या गावामध्ये मोबाईलला कोणत्याही कंपनीच्या रेंजअभावी शेतकऱ्यांची ई पीक विमा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फॉर्म तसेच गावामधील घटना घडामोडी या तात्काळ प्रशासनाला कळवता येत नाही.

आमच्या गावात मोबाईल टॉवरची रेंज येईल अशी व्यवस्था करण्यात यावी, अथवा आमचे गाव वडगाव तर्फे जवळा या गावाचे स्थलांतर जिथे टॉवरची सुविधा मिळेल आणि इतर सुविधा मिळेल अशा ठिकाणी गाव वसवावे अशी विनंती ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेऊन करण्यात आली आहे. हा ठराव सरपंच कलावती अरुण गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सूचक राधा बाजीराव देशमुख, उज्ज्वला बबन शिंदे यांच्या सूचनेनुसार ईश्वर मुंजाजी तरटे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आहे.

गावकऱ्याचे शिष्टमंडळ नुकतेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले आहे. त्यामुळे गावाला टॉवरची रेंज मिळेल किंवा नाही याबाबत गावकऱ्यासह पंचक्रोशीतील नागरिकांचे या निवेदनाकडे लक्ष आहे.

Back to top button