संगमनेर साकुर व मालदाड येथील पाणी योजनांसाठी प्रशासकीय मान्यता

संगमनेर साकुर व मालदाड येथील पाणी योजनांसाठी प्रशासकीय मान्यता

संगमनेर शहर : प्रतिनिधी :  काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील साकुर व मालदाड येथील नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. थोरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने संगमनेर तालुक्यातील विविध गावांच्या विकासासाठी मोठा निधी मिळविला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्यांच्या कामाला दिलेली गती व त्यासाठी मिळवलेल्या मोठा निधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे कालव्यांची कामेही अंतिम टप्प्यात आली आहे, तसेच विविध रस्ते व पाणीपुरवठा योजनांसाठीही सुमारे 700 कोटींचा निधी मिळवला होता. आता नव्याने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे व जि. प. सदस्या मीराताई शेटे आणि शंकरराव खेमनर यांच्या पाठपुराव्यातून साकूर व मालदाड गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये साकूर पाणी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 20 कोटी 39 लाख 62 हजार रुपये इतक्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास अटी व शर्तींची पूर्तता करण्यास अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तर मालदाड येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 18 कोटी 71 लाख 98 हजार रुपयांचा अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या दोन्ही गावांमधील नागरिकांच्या कुटुंबांना घरापर्यंत नळाद्वारे पाणी मिळणार आहे. या योजनेसाठी साकूर व मालदाडच्या विविध पदाधिकार्‍यांनाही सातत्याने पाठपुरावा केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news