विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात : तंत्रशिक्षण संचालनालयाचे निर्देश | पुढारी

विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात : तंत्रशिक्षण संचालनालयाचे निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांमध्येच तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यासाठी काही तंत्रशिक्षण संस्थांना सुविधा केंद्रांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित सुविधा केंद्रांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सुविधा केंद्रांच्या प्राचार्यांना दिले आहेत. डॉ. मोहितकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया (कॅप) लवकरच सुरू करण्यात येणार असून, प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक संचालनालयाद्वारे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने दहावीनंतरच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रियेसाठी सुविधा केंद्र म्हणून नियुक्त केलेल्या सुविधा केंद्रांच्या सर्व प्राचार्यांनी, संचालकांनी दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सुविधा केंद्रांकडे किमान आवश्यक सुविधा आवश्यक राहतील, तसेच सुविधा केंद्रांनी कर्तव्ये व जबाबदार्‍या आणि वेळोवेळी देण्यात येणार्‍या सूचनांप्रमाणे जबाबदारीने, सचोटीने व अचूकपणे कर्तव्ये पार पाडावीत. सुविधा केंद्रप्रमुखांनी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सहजतेने पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रथम व द्वितीय वर्षासाठी स्वतंत्र सुविधा केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातील प्रणाली व्यवस्थापक डॉ. उमेश कोकाटे हे सुविधा केंद्रांसाठी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहतील. सुविधा केंद्रप्रमुखांनी काही अडचणी उद्भवल्यास त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असेही डॉ. मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button