शेतीच्या वादातून तांदुळवाडीत हाणामार्‍या, राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर फिर्यादी दाखल | पुढारी

शेतीच्या वादातून तांदुळवाडीत हाणामार्‍या, राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर फिर्यादी दाखल

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : पाणी देण्याचे बारे बंद केल्याच्या कारणावरून सोमनाथ पेरणे यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादहा वाजेदरम्यान सोमनाथ पेरणे व त्यांचे आई-वडील त्यांच्या घरासमोर उभे होते. त्या ठिकाणी आरोपी आले व म्हणाले की, पाणी देण्याचे बारे बंद का केले. या कारणावरून सोमनाथ पेरणे व त्यांच्या वडिलांना आरोपींनी लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

सोमनाथ पोपट पेरणे (वय 20, रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुखदेव बाबुराव पेरणे, संदीप सुखदेव पेरणे, अक्षय सूर्यभान धसाळ (तिघे रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात करीत आहेत. दुसर्‍या घटनेत अ‍ॅड. संदीप पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सामाईक बांधाच्या वादावरून अपणास लाकडी दांडा व दगडाने मारहाण करण्यात आली.

तांदूळवाडी येथे घडलेल्या या घटनेत अ‍ॅड. संदीप पेरणे हे जखमी झाले आहेत. दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्यादरम्यान तांदूळवाडी येथील शेतात घटनेतील आरोपींनी सामाईक बांधावरील वादावरून अ‍ॅड. संदीप पेरणे यांना व त्यांच्या वडिलांना लोखंडी गज, लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली, तसेच शिवीगाळ दमदाटी केली.

पोलिसांनी आरोपी सोमनाथ पोपट पेरणे, पोपट बाबुराव पेरणे, संगीता पोपट पेरणे (तिघे रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) तसेच परसराम धनाजी कोळसे (रा. शिलेगाव, ता. राहुरी) या चार जणांवर मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शहामद शेख हे करीत आहेत.

Back to top button