व्हिडिओ : तो गळ्यात छडी धरुन वाचतो अन् पायाने लिहितो, कार्तिकची दिव्यांगावर मात | पुढारी

व्हिडिओ : तो गळ्यात छडी धरुन वाचतो अन् पायाने लिहितो, कार्तिकची दिव्यांगावर मात

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : जन्मत:च दोन्ही हात नाही म्हणून त्याने हार मानली नाही. हात नसले तरी गळ्यात छडी धरून फळ्यावरील वाचतो…पायानेच लिहितो, खातो, पितो इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपले जीवन जगतो. आपल्यात काही कमी आहे याची जाणीव त्याला कधीच होत नाही. असा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कार्तिक मोरे आपली सर्व कामे स्वत: करतो. स्वत:वरील आत्मविश्वास व शिक्षकांकडून मिळालेली प्रेरणा यामुळे दिव्यांगावर मात करत तो स्वावलंबी जीवन जगत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर केंद्र असलेल्या पळसगावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात कार्तिक मोरे शिकत आहे. कार्तिकचे आई-वडील मजुरी करतात. कार्तिकला जन्मत:च खांद्यापासून दोन्ही हात नाहीत. त्याला दोन्ही हात नाही मग तो कसा शिक्षण घेणार.. कसा लिहिणार असे प्रश्न कार्तिकच्या आई वडिलांसमोर होते. त्यामुळे त्यांनी त्याला शाळेत पाठवायचेच नाही असे ठरवले. मात्र शाळेतील शिक्षकांनी त्याला शाळेत पाठवा तो हुशार आहे तो शिकेल, शिकला तर त्याचे भविष्य चांगले होईल, अशी त्याच्या पालकांची मनधरणी केली. कार्तिकला पहिलीच्या वर्गात दाखल करून घेतले. कार्तिक जिद्दी असल्याने त्याने विकलांगतेवर मात केली.

शाळेत छडी खांदा व मानेमध्ये धरत फळ्यावर लिहिलेले वाचणे तसेच पायाने लिहिणे सुरू केले. आता तो चौथीच्या वर्गात शिकत आहे. त्याला हात नाही असे तो मानतच नाही तो इतर मुलांप्रमाणेच खेळतो, बागडतो. शालेय पोषण आहारात मिळणारी खिचडी तो पायात चमचा धरून खातो. यात शाळेचे मुख्याध्यापक भाऊसिंग सोनवणे व शिक्षिका सुरेखा वाघ यांचा मोलाचा वाटा आहे.

Back to top button