आम्ही उचललेल्या पावलांमुळे यश | पुढारी

आम्ही उचललेल्या पावलांमुळे यश

मुंबई :  मी आज मुख्यमंत्री नसलो, तरी आमच्या काळात सर्वानुमते जी पावले उचलण्यात आली होती त्यांना यश मिळाले यासारखे समाधान नाही, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

तेे म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होते. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही. कारण, सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणे हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असते.

हा तिढा अवघड होता; पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्‍वासात घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख जयंतकुमार बांठिया यांचेही ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. बांठिया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले त्याबद्दल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होते. शिवाय, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केले. खरे तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, यावर लक्ष केंद्रित करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले, असे ठाकरे यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

Back to top button