बीड : डाक पार्सलच्या नावाखाली लाखोंच्या गुटख्याची वाहतूक; संभाजीनगर पोलिसांची कारवाई | पुढारी

बीड : डाक पार्सलच्या नावाखाली लाखोंच्या गुटख्याची वाहतूक; संभाजीनगर पोलिसांची कारवाई

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमधून लाखोंच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळाली होती. यानंतर डाक पार्सल नावाचा कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली असता, त्यामध्ये लाखोंचा गुटखा असल्याचे निदर्शनात आले. या कारवाईतून साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत बनवाबनवीचा प्रकार समोर आल्याने, बंद वाहनातून होणार्‍या अवैध मालवाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पो. ना. सचिन बाजीराव सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद (वय-35, रा. तपकन, हरीयाणा) यास मुद्देमालासह बुधवारी पहाटे ३ वाजता इटके कॉर्नर परळी वै. येथे अटक करण्यात आली आहे.

आरोपी सरफराज अहेमद दारुद याने स्वत:च्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मालाची विक्री केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भा. द. वि. कलम 328,272, 273 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. याप्रकरणी अधिक तपास पो. नि. एस. एस. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. नि. सी. एच. मेढके, पो. उप. नी. सी. एच. मेढके हे करीत आहेत.

हेही वाचा:

 

Back to top button