AAP सरकारचा पंजाबमध्ये मोठा निर्णय, प्रत्येक बिलावर ६०० युनिटपर्यंत वीज मोफत | पुढारी

AAP सरकारचा पंजाबमध्ये मोठा निर्णय, प्रत्येक बिलावर ६०० युनिटपर्यंत वीज मोफत

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : पंजाबमधील आप (Aam Aadmi Party) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता पंजाबमध्ये प्रत्येक बिलावर ६०० यूनिट वीज मोफत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत दिली आहे. पंजाबच्या जनतेला आम्ही आश्वासन दिले होते की आमचे सरकार (AAP) सत्तेत आल्यानंतर आम्ही ३०० यूनिट वीज मोफत देऊ. सरकारने या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले आहे. आता प्रत्येक बिलावर ६०० यूनिट वीज मोफत मिळेल. आम्ही पंजाबच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करु. आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो, असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील केजरीवाल सरकारनेदेखील याआधी दिल्लीकरांना घरगुती वीज २०० युनिटपर्यंत मोफत दिली होती. आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने ६०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबमधील भगवंत मान सरकारने याआधी रेशनच्या होम डिलीवरी योजनेला मंजुरी दिली होती. यामुळे पंजाबमधील १.५४ कोटी लाभार्थी जनतेला गव्हाचा आटा घरपोच मिळणार आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने विविध विभागांत २६,४५४ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई, एक आमदार एक पेन्शन योजनेलाही मंजुरी दिली होती.

Back to top button