जालना : वहिनीसह दोन मुलींना दिराने जिवंत जाळले | पुढारी

जालना : वहिनीसह दोन मुलींना दिराने जिवंत जाळले

जाफरबाद; पुढारी वृत्तसेवा : गाढ झोपलेल्या एका महिलेसह तिच्या दोन मुलींना घराला आग लावून दिराने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील कोनड येथे मंगळवारी उघडकीस आली. आगीतून या तिघी मायलेकींनी मोठ्या धाडसाने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या अंगावर जळता टेंभा फेकल्याने त्या गंभीर भाजल्या आहेत.

या तिघींवर सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगला राजेंद्र परिहार, मुलगी पूनम आणि ज्ञानेश्वरी (रा. कोनड) या घटनेत गंभीर भाजल्या आहेत.याप्रकरणी महिलेचा दीर समाधान रामसिंग परिहार यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मंगला यांच्या पतीचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्या आपल्या दोन मुलींसह शेतात घर करून राहतात. गेल्या काही महिन्यांपासून दीर समाधान याचा वहिनी मंगला हिच्यासोबत शेती वाटणीवरून वाद सुरू आहे. घटनेच्या चार दिवसांपूर्वी मंगलबाई शेतात पेरणी करत असताना समाधानने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर समाधानने त्यांचा काटा काढण्याचा कट रचला.

रविवारी (दि.3) मध्यरात्रीच्या सुमारास मंगलबाई दोन्ही मुलींसह झोपलेल्या असताना आरोपीने घराला आग लावली. धूर पाहून मुलीने आपल्या बहिणीसह आईला झोपीतून उठवले. मंगलाबाईंनी आगीतून वाचण्यासाठी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजाची कडी बाहेरून लावण्यात आली असल्याने त्यांनी खुर्चीवर उभे राहून, बाहेर हात घालून दरवाजाची कडी उघडत मुलींसह घराबाहेर पळ काढला. घरासमोर दीर समाधान हा फवारणीचा पंप पाठीवर घेऊन उभा होता. समाधानने या तिघींच्या दिशने आगीचा टेंभा फेकला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत या तिघींना प्रथम चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी मुलगी पूनम हिच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाठलाग करून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिस गावात आल्याची माहिती मिळताच आरोपीने घराच्या मागील दरवाजातून उडी मारत शेताच्या दिशने पळ काढला. त्यानंतर मदन यांनी जवळपास अर्धा किमी पाठलाग करून आरोपीस ताब्यात घेतले.

Back to top button