पोखर्णी खून प्रकरणातील आरोपीचा शोध लागेना; घटनेला 10 दिवस उलटले | पुढारी

पोखर्णी खून प्रकरणातील आरोपीचा शोध लागेना; घटनेला 10 दिवस उलटले

बिलोली, पुढारी वृत्तसेवा ः अंगावरील सोन्या -चांदीचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने वृद्ध महिलेस मारहाण करून गळा दाबून खून केल्याची घटना बिलोली तालुक्यातील पोखर्णी येथे 15 जून रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेला दहा दिवस उलटले तरीही, या प्रकरणातील आरोपीचा शोध अद्यापही बिलोली पोलिसांना लागला नाही. त्यामुळे बिलोली पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. पोखर्णी येथील वृद्ध महिला गंगाबाई बोडके यांच्या खून प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पो. नि. शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.

या प्रकरणातील फिर्यादी यादवराव हाणमंतराव पाटील (वय 76, रा. हवरगा ता. देगलूर) यांचा विवाह मयत गंगाबाई राजेप्पा बोडके (वय 65, रा. पोखर्णी) यांच्यासोबत 1965 मध्ये झाला होता. तेव्हा ते पोखर्णी येथे घरजावई म्हणून होते. जवळपास पाच वर्षांनंतर कौटुंबिक वादातून मयत गंगाबाई बोडके व यादवराव पाटील यांची फारकत झाली होती. तद्नंतर यादवराव यांनी दुसरा विवाह केला. मयत गंगाबाई बोडके यांना एक गंगाधर नावाचा भाऊ होता, तो 1988 मध्ये मरण पावला, तेव्हा गंगाबाई बोडके यांना कोणीच जवळचा नातेवाईक राहिला नाही. त्यामुळे गंगाबाईच्या वतीने गावातील लोकांनी यादवराव यांच्याकडे जाऊन आता गंगाबाई यांना कोणीच रहीले नाही. त्यामुळे गंगाधर बोडके यांच्या नावावर असलेली संपत्ती तुमच्या मुलाच्या नावावर करा व तिच्याकडे लक्ष द्या तिचा सांभाळ करा, असे सांगितले.

सदरची संपत्ती यादवराव पाटील यांचा मुलगा राजेश पाटील यांच्या नावावर केली होती. या संपत्तीमध्ये 5 एकर 27 गुंठे जमीन आणि पोखर्णी येथील रहात्या घराचा समावेश आहे. त्यानंतर यादवराव व त्यांचा मुलगा अधून-मधून गंगाबाई बोडके यांच्याकडे येऊन त्यांना काही कमी जास्त लागले, तर पाहत होते व शेतीची पण मशागत तेच करत होते. अशातच गंगाबाईचा 15 जूनच्या मध्यरात्रीला झोपेत खून झाला.

यादवराव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात मृत गंगाबाई बोडके यांची शेवटची भेट पंधरा दिवसांपूर्वी झाली होती. मी पोखर्णी येथे शेतीचे सपाटीकरण करण्याच्या कामासाठी आलो होतो. गंगुबाई बोडके यांचा खून कोणी केला व त्यांच्या अंगावरील दागिने कोणी चोरले, याबाबत कोणावरही संशय नसल्याची माहिती यादवराव यांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे सदरील प्रकरण गुंतागुंतीचे ठरले असून, सदरील प्रकरणाचा गुंता सोडवून पो.नि. शिवाजी डोईफोडे त्या अज्ञात मारेकर्‍याचा शोध घेतील काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून सदरील प्रकरणातील मारेकर्‍याला अटक करण्याची मागणी नातेवाइकाकडून केली जात आहे.

पोखर्णी येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील अज्ञात आरोपीविरुद्ध बिलोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मारेकर्‍याचा शोध चालू आहे. या प्रकरणात काही संशयितांची चौकशीही करण्यात आली. लवकरच सदरील प्रकरणातील आरोपीचा शोध लावला जाईल.
– शिवाजी डोईफोडे (पो.नि. तथा तपास आधिकारी )

हेही वाचलंत का? 

Back to top button