बिबट्याने घरात घुसून केला वृध्द महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी | पुढारी

बिबट्याने घरात घुसून केला वृध्द महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी

साडवली : पुढारी वृत्तसेवा बिबट्याने घरात शिरून वृध्द महिलेवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये येथे सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. श्रीमती कलावती काशीराम कुळ्ये (वय-७५) असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

या महिलेने प्रसंगावधान राखत घराबाहेर पडत बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यांच्या या धाडसाचे ग्रामस्थांमधून कौतुक करण्यात येत आहे. तर पुढील व मागील असे दोन्ही दरवाजे कडीच्या सहाय्याने बंद करून घेत या आजीने बिबट्याला घरातच कोंडून ठेवले.

याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, श्रीमती. कलावती कुळ्ये या आपल्या घरामध्ये रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेल्या. मात्र घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने या दरवाजातून बिबट्याने मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घरात प्रवेश केला. याचवेळी घरातील कोंबड्यांनी ओरडायला सुरूवात केली. कोंबड्या ओरडत असल्याच्या आवाजाने कलावती यांना जाग आली. यानंतर त्या कोंबड्या का ओरडत आहेत हे बघण्यासाठी गेल्या असता घरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्याने कलावती या पुरत्या घाबरून गेल्या. मात्र उद्भवलेल्या प्रसंगाला धिराने तोंड देत त्यांनी वेळीच घराबाहेर पडत बिबट्याच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवला. घराबाहेर पडताच त्यांनी दोन्ही दरवाज्यांना बाहेरून कडी लावून बिबट्याला घरातच कोंडले. मात्र तोपर्यत बिबट्याच्या हल्ल्यात कलावती या गंभीर जखमी झाल्या होत्या. घराबाहेर पडताच कलावती यांनी आरडाओरडा केला. यावेळी आजुबाजूचे ग्रामस्थ धावत आले. सुरेश गंगाराम खांडेकर, शांताराम करंडे, प्रतीभा भोल्ये यांनी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कलावती यांना तात्काळ उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील श्री. इंदुलकर यांनी देवरूख वनविभागाला दिली. यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे, सुरज तेली, आकाश कडूकर, संजय रणधीर यांनी घटनास्थळी पिंजऱ्यासह धाव घेतली व पंचनामा केला. यानंतर सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

या बिबट्याचे वय अंदाजे सात वर्षे असून तो नर जातीचा आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख यांच्याकडून या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तो सुस्थितीत असल्याची खात्री होताच त्याला वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा बिबट्या भक्षासाठी कोंबड्यांच्या वासाने घरात शिरला असावा, असा अंदाज वनपाल तौफीक मुल्ला यांनी व्यक्त केला आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कलावती कुळ्ये यांना औषधे उपचारासाठी देय असलेली रक्कम शासनाच्यावतीने देण्यात येईल, असे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी सांगितले.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी गावात आढळून आल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 या नंबरवर माहिती देण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढला असून थेट मानवी वस्तीत घुसून बिबट्याकडून हल्ल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button