

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा
मावळ तालुक्यात भात शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांत किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे नांगरणी, कोळपणी शेतीची डागडुजी करताना शेतकरी दिसून येतात. मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील काही शेतकर्यांनी धूळ वाफेवर पेरणीला सुरुवात केली होती.
परंतु पाऊस उशिरा झाल्याने धूळ वाफेवर पेरलेले भात बियाणे कमी प्रमाणात उगवल्याने काही शेतकर्यांना भात पेरणी पुन्हा करावी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मावळ तालुक्यात भात हे पीक मुख्य असल्याने यावर्षी शेतकर्यांनी कोळम, इंद्रायणी, सोनम, रूपाली बासमती, पूर्वा, रत्ना अशा विविध वाणाच्या बियाण्यांना पसंती देत पेरणी केली आहे. भात पिकासाठी कृषी अधिकार्यांकडून योग्य बियाणांची पेरणी कशाप्रकारे करावी याची माहिती मिळत आहे. मावळ तालुक्यात दोन तीन दिवसांपूर्वी पावसाने चांगली हजेरी लावल्याने सध्या पावसाने उघडीप दिल्याने मशागतीच्या कामांना वेग आलेला दिसून येत आहे.