बीड : केज येथे मोटरसायकल- एसटी बसच्या अपघातात एक ठार, एक जखमी | पुढारी

बीड : केज येथे मोटरसायकल- एसटी बसच्या अपघातात एक ठार, एक जखमी

केज : गौतम बचुटे; येथे केज-अंबाजोगाई रोडवर सोनीजवळा पाटी जवळच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ एसटी बस आणि मोटरसायकलीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. तर त्यांना पाहून गावाकडे परत येत असलेल्या युवकाच्या दुचाकीचा अंबाजोगाई येथे अपघात झाला आणि त्यात तोही जखमी झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १४ जून मंगळवार रोजी रात्री ७:३० वाजण्याचा दरम्यान केज येथे केज-अंबाजोगाई रोडवर सोनिजवळा पाटी जवळील जलशुद्धीकरण केंद्रा जवळ लातूर-बीड या लातूर कडून बीडकडे जाणाऱ्या एसटी बस क्र. (एम एच-२०/बी एल-१९२४) आणि मोटरसायकलचा क्र. (एम एच-२५/ एस-१९२४) अपघात झाला. अपघातात सतीश गोवर्धन मस्के (वय २५ वर्ष, रा. सावळेश्वर, पैठण ता. केज जि. बीड) या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याच्यामागे मोटर सायकलवर बसलेला दिपक श्रीहरी डिसले (वय २४ वर्ष) रा. सावळेश्वर (पैठण) ता. केज जि. बीड गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह महादेव बहिरवाळ, हनुमंत गायकवाड आणि संतोष गित्ते यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातातील जखमी आणि मयत यांना उपजिल्हा रुग्णालय केज व नंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मित्राचा अपघात होताच त्यांना पहायला गेलेल्या मित्राचाही अपघात!

दरम्यान, अपघाताची माहीती मिळताच अपघातग्रस्त तरुणांचा सावळेश्वर येथील मित्र ऋषीकेश गणेश मस्के हा त्यांना भेटून गावाकडे परत येत असताना दि. १५ जून बुधवार रोजी मध्य रात्री १ च्या दरम्यान त्याच्या दुचाकीचा अंबाजोगाई येथील शिवाजी चौकाजवळ अपघात झाला. त्या अपघातात ऋषीकेश गणेश मस्के वय (२४ वर्ष) रा. सावळेश्वर (पैठण) ता. केज जि. बीड गंभीर जखमी झाला आहे. दीपक श्रीहरी डिसले व ऋषीकेश गणेश मस्के या दोघांवर लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषिकेश मस्के यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button