बीड : तृतीयपंथी सपना आणि बाळूचा थाटात झाला विवाह | पुढारी

बीड : तृतीयपंथी सपना आणि बाळूचा थाटात झाला विवाह

बीड; पुढारी वृत्तसेवा : तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह नुकताच संपन्न झाला. भारतातील पहिली सून होण्याचा ज्यांनी मान मिळवला त्या शिवलक्ष्मी यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिरामध्ये धार्मिक विधीनुसार उत्साही वातावरणात आणि थाटामध्ये हा विवाह पार पडला.

याविषयी अधिक माहिती अशी की, बीड येथील ऐतिहासिक श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदीर परिसरात सोमवारी सकाळी 11.35 वाजता तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह अखेर थाटामाटात संपन्न झाला. सकाळी 11:30 वाजता श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदीर परिसरात नववधू किन्नर सपना आणि नवरदेव बाळू यांचे आगमन झाले. यावेळी विधीवत पूजन करून कंकालेश्वर मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन सजलेल्या रथामधून नवरदेवाची भव्यदिव्य वरात काढण्यात आली. या वरातीमध्ये शिवलक्ष्मी, त्यांचे पती संजय झाल्टे, किन्नर आखाड्याचे मुख्य व्यवस्थापक श्री महंत ऋषिकेश नंदगिरी तसेच शिवलक्ष्मीचे दीर तेजस झाल्टे रथामध्ये सहभागी झाले होते.

नवरदेवाची वरात कंकालेश्वर मंदीर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी किन्नर महिलांनी मनसोक्त नृत्य करून या बीड जिल्ह्यात होत असलेल्या पहिल्या विवाह सोहळ्याचा आनंद घेतला. यानंतर धार्मिक विधीनुसार 5 पुजाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंतरपाट धरून मामांच्या साक्षीने मंगलाष्टक म्हणून हा जगावेगळा विवाह अखेर पूर्ण झाला. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये तृतीयपंथीयांचा हा दुसरा विवाह असला तरीदेखील सार्वजनिकरित्या सर्वसामान्य वधू-वरांचे विवाह ज्या पद्धतीने वाजत-गाजत साजरे होतात. त्याला लोक मान्यता मिळते. अगदी त्याच धर्तीवर हा विवाहसोहळा पार पडल्याने असा विवाह कदाचित भारतामध्ये तो सुद्धा बीडमध्ये पहिल्यांदाच पार पडला.

या वेळी कन्यादान करण्यासाठी करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत यांच्यासह त्यांच्या सहकारी प्रीत कुकडेजा, शीतल राजपूत, शितल धोंडरे व पत्रकार शेख आयेशा आणि प्रशासनाच्या वतीने समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि त्यांच्या प्रशासकीय टीमने अधिकृतपणे कन्यादान केले. यावेळी तत्वशील कांबळे, अशोक तांगडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button