हिंगोली : शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षांकडून सत्ता संघर्ष | पुढारी

हिंगोली : शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षांकडून सत्ता संघर्ष

सेनगाव, पुढारी ऑनलाईल : नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कुणाला सोडले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. प्रधानसचिव मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली असून सेनगावच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलाकरीता सोडण्यात आले आहे. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी आणि भाजपा या तीनही पक्षांकडून सत्ता संघर्ष सुरू आहे.

सेनगाव नगरपंचायतची निवडणूक निकाल जाहीर होऊन आज दहा दिवस उलटले. यामध्ये एकूण १७ नगरसेवक आहेत. त्यापैकी १३ महिला तर चार पुरुष आहेत. त्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्ष पद नेमकं कुणाला सोडण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बऱ्याच सदस्यांना आशा होती सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षण सोडण्यात यावे. आज गुरुवारी प्रधानसचिव मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली असून सेनगावच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलाकरीता सोडण्यात आले आहे. त्यामुळे या खुर्चीवर बसण्यासाठी सर्वच पक्षांकडून ताकद पणाला लावली जात आहे. तर काही पक्षाच्याअंतर्गत नगराध्यक्ष पदाकरीता संघर्ष सूरु आहे.

तसेच, मागच्या वेळी येथील जनतेने असा कौल दिला होता की या ठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळाली. त्यावेळी सर्वसाधारण पुरुषाला जागा सोडण्यात आल्यामुळे भाजपाने सेना व राष्ट्रवादीला सोबत घेऊन नगराध्यक्ष पद स्वतःच्या ताब्यात घेतले होते. यावेळी मात्र सेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांना समान कौल मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ दोन पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. आता कुठल्या पक्षाला सत्तेत जागा मिळते आणि कुठले पक्ष सत्तेबाहेर राहणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्‍यान, १३ महिला सदस्य आणि आता नगराध्यक्षपदी महिलाच असणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाकडे महिला प्रतिनिधी लक्ष देणार आहे. १७ नगरसेवकांपैकी १३ महिला सदस्या आहेत. त्यामुळे सभागृहात महिलांना प्रथम प्राधान्य असणार आहे. पूर्वी महिलांना चूल आणि मूल एव्हढंच पहायला मिळायचं आता मात्र महिलांना नगराध्यक्ष सारख्या जबाबदार पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने सेनगाव नगरपंचायतची सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे.

हे ही वाचलं का 

 

Back to top button