हिंगोली : फवारणीचे औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी

हिंगोली : फवारणीचे औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा

दिड एकर शेती अन 41 हजाराचे कर्ज, त्यातच अतिवृष्टीने पिकही हाती आले नाही. यामुळे कर्जफेडीची चिंता लागलेल्या कळमनुरी तालुक्यातील कवडी येथील शेतकरी देवराव माधवराव पतंगे (वय 65) यांनी तणनाशक फवारणीचे औषध पिऊन मृत्यूला कवटाळले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात (शुक्रवार) रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कवडी येथील देवराव पतंगे यांच्या मालकीची दिड एकर शेती आहे. या शेतीवर पत्नी व दोन मुलांचा उदरनिर्वाह चालतो. या शेतीवर त्यांनी आखाडा बाळापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून 41 हजार रुपयांचे कर्जही घेतले होते. खरीप हंगाम चांगला येईल या अपेक्षेने त्यांनी शेतात सोयीबन पेरणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने सोयाबीनचे पिक खराब झाले. सोयाबीन हाती आले नसल्याने पिक कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती.

सदर बाब ते मुलांना बोलून दाखवत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री साडेआठ वाजता त्यांनी घरातच तणनाशक फवारणीचे औषध प्राशन केले. हा प्रकार पतंगे कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी आखाडा बाळापूर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डिगांबर देवराव पतंगे यांच्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक बालाजी पुंड पुढील तपास करीत आहेत.

Back to top button