थर्टीफर्स्ट नियम पाळून साजरा होणार | पुढारी

थर्टीफर्स्ट नियम पाळून साजरा होणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शासन नियमांचे पालन करून सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. हॉटेल्स, लॉन्स, फार्म हाऊस तसेच निसर्गरम्य स्थळांची 31 डिसेंबरला ( थर्टीफर्स्ट ) जल्लोष करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स तसेच बगीचांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दोन वर्षांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्याची संधी मिळत आहे. कोरोनामुळे गतवर्षी ( थर्टीफर्स्ट ) जल्लोषावर पाणी फिरले होते. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग कमी होत असतानाच पुन्हा ओमायक्रॉनच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. त्यामुळे घरी राहूनच नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पण शासन नियमाचे पालन करून कोल्हापूरकर नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर केला जाणार आहे.

शासनाने या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध घालण्यास सरुवात केली आहे. सध्या रात्री नऊपासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थर्टीफर्स्ट चा जल्लोष साजरा करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी शासन नियमांचे पालन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.

Back to top button