कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : कपबशी विरूद्ध शिलाई मशिन | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : कपबशी विरूद्ध शिलाई मशिन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ( जिल्हा बँक निवडणूक ) अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर बुधवारी चिन्ह वाटप करण्यात आले. सत्ताधारी आघाडीने कपबशी, तर शिवसेनाप्रणीत राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलने शिलाई मशिन हे चिन्ह घेतले आहे. टोकाच्या राजकीय ईर्ष्येमुळे दोन्ही आघाड्यांत कपबशी हे चिन्ह घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात वाद-युक्तिवाद रंगला होता.

चिन्हासाठी चढाओढ ( जिल्हा बँक निवडणूक )

सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्यासमोर चिन्ह वाटप सुरू झाले. सत्तारूढ आघाडीने शाहूवाडी सेवा सोसायटी वगळता उर्वरित सर्व 14 जागांसाठी ‘कपबशी’ या चिन्हाची मागणी केली, तर शाहू आघाडीनेही 11 उमेदवारांसाठी ‘कपबशी’ हेच चिन्ह मागितले. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ हे चिन्ह वाटपाचे सूत्र असल्याने पेच निर्माण झाला. दोन्ही बाजूंचे सदस्य ‘कपबशी’ या चिन्हावर अडून बसले. नऊ वाजता कार्यालयात दाखल झाल्याचे सांगितले जाऊ लागले. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कार्यालय अकरा वाजता सुरू झाले, त्यामुळे कोण कधी आला हे ठरवणे मुश्कील आहे. टेबलावर आम्ही प्रथम अर्ज ठेवला असा युक्तिवाद झाला.

दरम्यान, सत्ताधारी आघाडीने नोटिसीतील सूचनेनुसार निवडणूक अधिकार्‍यांना मेलवर अर्ज पाठविला होता. तसेच सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने तडतोडीतून ‘कपबशी’ हे चिन्ह सत्ताधार्‍यांना मिळाले, तर शाहू आघाडीला दुसर्‍या पसंतीच्या ‘शिलाई मशिन’ या चिन्हावर समाधान मानावे लागले. दोन्ही आघाड्यांत चिन्ह मिळवण्यासाठीही चढाओढ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार असल्याचे संकेत आहेत.

शिरोळमध्ये ‘विमान’ आणि ‘कपबशी’त लढत ( जिल्हा बँक निवडणूक )

शिरोळ तालुका संस्था गटात अटीतटीची लढत होत आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सत्तारूढ गटाचे ‘कपबशी’ हे चिन्ह घेतले, तर गणपतराव पाटील यांनी ‘विमान’ चिन्हावर लढण्याचे निश्चित केले आहे. शिवसेनेसोबत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काडीमोड घेतलेल्या माजी खासदार निवेदिता माने ‘कपबशी’ चिन्हावर लढत आहेत.

प्रशासकीय लगबग झाली सुरू ( जिल्हा बँक निवडणूक )

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 15 संचालकपदांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. 5 जानेवारीला होणार्‍या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची लगबग सुरू झाली आहे. मतदान केंद्रांची निश्चिती करणे, कर्मचार्‍यांची नेमणूक, केंद्रांवरील आवश्यक बाबींची पूर्तता करणे आदींचे नियोजन सुरू झाले आहे. सुमारे 40 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, यासाठी 350 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने गेला महिना राजकीय घडामोडींनी गाजला. निवडणूक अर्ज दाखल करणे, पॅनेलची घोषणा आणि माघार नाट्य रंगले. निवडणुकीत कोणत्या गटात किती उमेदवार हे स्पष्ट झाले. चिन्ह वाटप झाले. आता प्रशासकीय यंत्रणा मतदानाच्या नियोजनासाठी मग्न झाली आहे. 21 संचालकांपैकी सेवा संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, तालुका संस्था गटातील मतदार हे सर्वसाधारण गटात मतदान करणार आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवरून फक्त सहा गटांची नावे कमी होतील. यंत्रणेला सर्व काही सोपस्कार पूर्ण करावेच लागणार आहेत.

तालुक्यासह मध्यवर्ती ठिकाणी मतदान केंद्र ठरवणे, मतदान केंद्रावर आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करणे, मत पत्रिकांची छपाई करणे, आवश्यक कर्मचारी आणि अधिकार्‍यांची नेमणूक करणे, निवडणूक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे आदी कामे येत्या काही दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत. जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

Back to top button