MLA P N Patil | आमदार पी. एन. पाटील : हजारो गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच उभा करणारे नेते | पुढारी

MLA P N Patil | आमदार पी. एन. पाटील : हजारो गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच उभा करणारे नेते

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार पी. एन. पाटील- सडोलीकर (MLA P N Patil) हे नाव घेतल्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्याच्या किंबहुना राज्याच्या राजकारणाचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. चहाचा कपही न घेता गोरगरीब शेतकऱ्यांच्या हजारो मुलांना नोकरी लावून त्यांचा प्रपंच उभा करणारे आमदार पी. एन. पाटील म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे दैवतच होते. राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी न करता सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर व वंचित घटकांसाठी करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आग्रही असणारे आमदार पी. एन. पाटील हे खऱ्या अर्थाने शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हितासाठी झटणारे नेते होते.

महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा मंत्र दिला होता. ग्रामीण भागात कृषी, अर्थसंस्कृती चांगलीच रुजलेली आहे. शेतकरी व शेती समृद्ध झाली, तर समाजाचा व देशाचा विकास होईल, हे तत्त्व उराशी घेऊन राजकारण करणाऱ्या राज्यातील मोजक्या राजकीय नेत्यांमध्ये आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर (MLA P N Patil) यांचे नाव अग्रभागी होते. गांधी, नेहरू घराणे व काँग्रेस पक्षासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर असणारी अविचल निष्ठा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील व वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात कृषी, औद्योगिक क्रांतीचे बीज पेरले. यातूनच पुढे महाराष्ट्राच्या विकासाचा वृक्ष बहरला. महाराष्ट्रात सहकाराची पंढरी फुलली. या सहकाराच्या पंढरीत अनेक वारकरी निर्माण झाले. त्यापैकीच एक नाव म्हणजे आमदार पी. एन. पाटील- सडोलीकर हे होय.

आमदार पाटील (MLA P N Patil) यांनी चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत हा माझा, हा तुझा असा भेदभाव कधीही केला नाही. किंबहुना हे ‘विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणे जिल्ह्याच्या विकासाला वेग दिला. केवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित न जोपासता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी राज्य शासनाला अनेक धोरणात्मक निर्णय घ्यायला लावले. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे शेतकरी कर्जमाफी व शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय होय. आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत त्यांनी शेतकरी विकासासाठी अत्यंत आग्रही भूमिका घेतली. दहा-बारा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची विधिमंडळात मागणी करणारे पी. एन. पाटील हे एकमेव व पहिले आमदार होते. त्यानंतर केंद्र शासनाने ७२ हजार कोटींची व राज्य शासनाने साडेसहा हजार कोटींची जी कर्जमाफी दिली, त्या पाठीमागे त्यांचा पाठपुरावाच कारणीभूत होता.

प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली होती. त्याचा विचार करून हा निर्णय अमलात आणणे राज्य शासनाला त्यांनी भाग पाडले, महाराष्ट्र शासनाने प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजारपर्यंत सानुग्रह अनुदान दिले असून, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. केवळ पी. एन. पाटील यांच्या आग्रहामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ झाला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना सव्वाचारशे कोटी रुपयांचा लाभ झाला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर सलग ३५ वर्षे ते कार्यरत होते. त्यापैकी सलग पाच वर्षे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रात उमटवला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याजात दोन टक्के सवलत देण्याचा देशात एकमेव व पहिला निर्णय त्यांनी घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना घर बांधणी, मोटारसायकल खरेदी, मुला-मुलींची लग्ने, पाईपलाईन, टीव्ही, फ्रीज या बाबींसाठी कर्ज योजना राबवल्या. त्यामुळे जिल्हा बैंक लोकाभिमुख झाली. त्याचबरोबर लोकांच्या गरजाही पूर्ण झाल्या. श्रीपतरावदादा बँकेसह राजीवजी सहकारी सूतगिरणी व निवृत्ती तालुका संघाच्या माध्यमातून सहकारात भरीव योगदान दिले. चहाचा कपही न घेता गोरगरीब शेतकऱ्यांच्या हजारो मुलांना नोकरी लावून त्यांचा प्रपंच उभा करणारे आमदार पाटील म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे दैवतच होते.

श्रीपतरावदादा बँकेची ४००० कोटी रुपयांची उलाढाल आमदार पाटील यांच्यावरील विश्वासाचे निदर्शक आहे. राज्यातील सूतगिरण्या अनेक अडचणींशी सामना करत असतानाही त्यांनी स्थापन केलेली राजीवजी सहकारी सूतगिरणी सुरळीतपणे चाललेली आहे. या सूतगिरणीतून शेकडो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असून, येथे उत्पादित होणारे सूत परदेशातही निर्यात होते. अडचणीतील सहकारी संस्था चालवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. हे त्यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दाखवून दिले.

हेही वाचा : 

Back to top button