आचार्य विशुद्धसागर महाराजांचे कोल्हापुरात भव्य स्वागत; भाविकांची गर्दी | पुढारी

आचार्य विशुद्धसागर महाराजांचे कोल्हापुरात भव्य स्वागत; भाविकांची गर्दी

किणी; पुढारी वृत्तसेवा : चर्याशिरोमणी आचार्य १०८ श्री विशुद्धसागर महाराज यांचे २९ पिच्छीधारी मुनिसंघासमवेत आज (दि.२९) कोल्हापूर जिल्ह्यात भक्तीपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणाहून हजारो श्रावक- श्राविका उपस्थित होते. तप आणि विद्वता यासाठी ओळखले जाणारे आचार्य विशुद्धसागर महाराज उत्तरेतून प्रथमच दक्षिण भारतात आले आहेत. त्यांच्याबरोबर उच्चविद्याविभूषित असे २९ मुनी आहेत. किणी टोल नाका येथे आज (दि.२९) सायंकाळी त्यांचे आगमन झाले.

नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, आचार्य चंद्रप्रभू सागरमहाराज, आ.राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी परिसरातून हजारो जैन बांधव त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. किणी टोल नाक्याजवळ उभारण्यात आलेल्या खास मंचावर मुनीश्रींची दुग्धचंदन आणि जल घालून पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर बँड, लेझीम पथकाच्या निनादात, ‘नमोस्तु शासन जयवंत हो’ च्या जयघोषात किणी गावात मिरवणुकीने मुनिसंघाचे आगमन झाले. गावातील प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी मुनिसंघाची पाद्यपूजा करण्यात आली. मिरवणुकीनंतर किणी येथील श्री १००८ पार्श्वनाथ मंदिर, श्री कुंथुनाथ मंदिर व श्री मल्लिनाथ मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत मुनिसंघाच्या दर्शनासाठी श्रावक -श्रविकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा :

Back to top button