रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे आर्थिक सबळ होण्यासाठी प्रयत्नशील: नारायण राणे | पुढारी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे आर्थिक सबळ होण्यासाठी प्रयत्नशील: नारायण राणे

साडवली : पुढारी वृत्तसेवा : कोकण हे माझे घर समजतो. मी कोकणातील आहे. कोकणात येताना मी भावूक होतो. कोकणात आल्यावर तुम्ही जो मला मानसन्मान देता, तो माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कोकण समृध्द व्हावे, यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे देशात आर्थिक सबळ जिल्हे व्हावेत, ही आपली मनापासूनची इच्छा असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवरूख येथे सोमवारी (दि.२९) केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटावर घणाघात केला.

महायुतीचा संगमेश्वर तालुक्याचा मेळावा देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात पार पडला. या मेळाव्यात बोलताना ना. राणे म्हणाले की, मागील १० वर्षात मोदी यांनी जगात विकसित देश म्हणून आपल्या भारत देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. कोरोना काळात मोदी यांनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. ८ कोटी लोकांना नळाने पाणी दिले. पावणे चार कोटी गरिबांना पक्की घरे बांधून दिली.

मला पदांची हाव नाही. कोकणातील माझ्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन मला करायचे आहे. तरूण-तरूणींनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. तुमच्या जीवनात बदल करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. यासाठी तुम्ही मला आपली सेवा करण्यासाठी मतदानरूपी आशिर्वाद द्यावेत, असे ना. राणे यांनी शेवटी म्हटले.

पालकमंत्री उदय सांमत म्हणाले की, मतदानाच्या ७० टक्के मतदान नारायण राणे यांना होईल. ज्याप्रमाणे आमदार शेखर निकम यांनी पायाला भिंगरी लावली आहे त्यानुसार ते नक्कीच आमच्यापेक्षा जादाचे मताधिक्य देतील, यात संदेह नाही. पण तुम्ही मताधिक्य दिलेत म्हणून मी काही नाराज होणार नाही. उलट तुम्हाला डीपीडीसी मधील जास्त निधी माझ्याकडून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, सदानंद चव्हाण आणि मी त्यावेळी विरोधी लढलो असलो तरी एका चांगल्या कामासाठी आता एकत्र आलो आहोत. आम्हाला निवडून द्या, आम्ही सेवक म्हणून आपले सदैव काम करू अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी, अभिजीत शेट्ये, मिथून निकम, राजेंद्र सुर्वे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, सदानंद भागवत, रश्मी कदम, संजय सुर्वे, हनिफ हरचिरकर, प्रफुल्ल भुवड, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे, मनसेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, देवरूख शहराध्यक्ष सागर संसारे, ऋतुराज देवरूखकर आदींसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोद अधटराव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button