Sangli news : सांगली ड्रग्ज तस्करीत ‘आंतरराष्ट्रीय’ कनेक्शन! | पुढारी

Sangli news : सांगली ड्रग्ज तस्करीत ‘आंतरराष्ट्रीय’ कनेक्शन!

दिलीप भिसे

कोल्हापूर : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकाला हादरवून सोडणार्‍या सांगली जिल्ह्यातील इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील एम.डी. ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीच्या उलाढालीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी टोळ्यांमधील दोन माफियांचे कनेक्शन मुंबई गुन्हे अन्वेषणच्या चौकशीत उघड झाले आहे. इरळीतील कारवाईनंतर विशेष पथकाने राजस्थान आणि गुजरातमध्ये छापेमारी केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. (Sangli news)

मुख्य संशयित वासुदेव लक्ष्मण जाधव याच्या शेतातील अड्ड्यावर सहा महिन्यांपासून आरोग्याला घातक ठरणारा ड्रग्ज निर्मितीचा उद्योग सुरू होता, अशीही खळबळजनक माहिती चौकशीतून पुढे येत आहे.

पुणे आणि कुपवाड पोलिसांनी 21 फेब—ुवारी 2024 रोजी कुपवाड येथील स्वामी मळ्यात पत्र्याच्या शेडवजा खोलीवर छापा टाकून सुमारे 300 कोटी रुपये किमतीचा 140 किलो एमडी ड्रग्जसाठा जप्त केला होता. याप्रकरणी मुख्य संशयित आयुब मकानदारसह तीन स्थानिक तस्करांना जेरबंद करण्यात आले. कुपवाड येथील ड्रग्ज तस्करीची वरिष्ठ स्तरावर विविध शोध पथकांद्वारे पोलखोल सुरू असतानाच मुंबई येथील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी टोळीच्या उलाढालीचा मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाला सुगावा लागला.

Sangli news : कुपवाडपाठोपाठ महिन्यात ड्रग्जचा साठा लागला हाताला!

मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाला सांगली जिल्ह्यातील ढालेवाडी-डोर्ली रस्त्यालगत इरळी (ता. कवठेमहांकाळ) हद्दीतील वासुदेव जाधव याच्या द्राक्ष बागेलगत असलेल्या अड्ड्यावरील ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीचा छडा लागला. पथकाने छापा टाकून सुमारे 254 कोटी रुपये किमतीचा ड्रग्जसाठा हस्तगत केला आहे. कुपवाडपाठोपाठ कवठेमहांकाळ तालुक्यात ड्रग्ज तस्करीची सर्वात मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय माफियांसह स्थानिक कनेक्शनचा सुगावा

मुंबई पोलिसांनी अड्ड्याचा मालक व मुख्य संशयित वासुदेव लक्ष्मण जाधव (वय 34), प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे (35), प्रसाद बाळासाहेब मोहिते (24), विकास महादेव मलमे (25), अविनाश महादेव माळी (28) यांना अटक केली आहे. वासुदेव जाधव याच्या चौकशीतून ड्रग्ज तस्करीतील आंतरराष्ट्रीय माफियांसह स्थानिक कनेक्शनही पुढे येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

बिल्डर, सेलिब्रिटींसह उद्योजकांकडूनही खंडणी वसुली!

ड्रग्ज तस्करीतील नामचिन माफियांनी यापूर्वी बिल्डर, सेलिबि—टींसह उद्योजक, व्यावसायिकांना धमकावून मोठमोठ्या खंडण्या वसूल केल्याने त्याच्याविरुद्ध मुंबईसह राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली, हरियानासह पंजाबमध्ये गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे समजते. वासुदेव जाधव याच्या चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी राजस्थान, गुजरात तसेच मुंबईतही काही ठिकाणी छापेमारी केली. मुंबईतून चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच संशयित असे एकूण 9 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

संशयित वासुदेव जाधव याची अल्पावधीतील श्रीमंती संशयास्पद!

जेमतेम शिक्षण असलेला वासुदेव द्राक्ष, बेदाणे विक्रीचे काम करीत होता. भागभांडवलासाठी त्याने 35 ते 40 लाखांचे कर्ज उचलले होते. व्यवसायात तोटा झाला. याकाळात त्याच्या मुंबईसह गुजरात व राजस्थानात फेर्‍या सुरू झाल्या. वर्षापूर्वी अलिशान मोटार खरेदी केली. त्यानंतर तयार द्राक्षबागेसह 4 एकर शेत खरेदी केले. द्राक्षबागेजवळच शेडवजा दोन मोठ्या खोल्या बांधल्या. या खोलीतून मिक्सर मशिन, ग्रायंडरसह अन्य मशिनरी तसेच सुमारे 245 कोटी रुपये किमतीचा 122.5 किलो ड्रग्ज निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. अल्पावधीत त्याची श्रीमंती नजरेत भरणारी आहे. (पूर्वार्ध)

पुत्र मालामाल होऊनही आई, वडील मोलमजुरीत!

ड्रग्ज तस्करीतून मालामाल झालेल्या मुख्य संशयिताने अलीकडच्या काळात काही निवडक मित्रांवर मौजमजा आणि चैनीसाठी मोठमोठ्या रकमांची उधळण केल्याची परिसरात चर्चा आहे. मुलापासून विभक्त राहणारे त्याचे आई, वडील आजही मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपूर्वी ढालेवाडी येथे त्याने टुमदार बंगलाही खरेदी केला आहे.

Back to top button