Summer heat : उन्हाचा चटका, आरोग्याला फटका ! | पुढारी

Summer heat : उन्हाचा चटका, आरोग्याला फटका !

कोल्हापूर : जिल्ह्यात कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्याला फटका बसू लागला आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. उपयुक्त इलेक्ट्रोलाईटस्सुद्धा कमी होतात. त्यामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणे, चिडचिड होणे, अतिशय घाम येणे असे त्रास होतात. अशा परिस्थितीत आरोग्य आणि आहारासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. (Summer heat)

हलके अन्न खाणे, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. चरबीयुक्त आणि तळलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कडक उन्हाळात जाणे टाळावे. वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जि. प. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवला आहे. वैद्यकीय पथकांनाही सतर्क राहण्याची सूचना केली आहे. उष्माघात, त्वचाविकार, डोळ्यांचे आजार, बुरशीजन्य संसर्ग, डिहायड्रेशन, मूत्रपिंडाचे आजार उद्भवू शकतात.

Summer heat : काय घ्यावे…

लिंबूपाणी, ताक, पन्हे, पुदिना सरबत, नारळपाणी, दही अशा पदार्थांचे उन्हाळ्यात नियमित सेवन करावे. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, तसेच जठरातील आम्लाची पातळी कमी करण्यास मदत होते. थकवा कमी होतो. पोटातील आग आणि पित्त दूर होते. शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवण्यास मदत होते. शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते आणि शरीर आतून स्वच्छ ठेवण्यास या पेयामुळे मदत होते.

काय टाळावे…

आईस टी, बर्गर आणि हॉट डॉग्स, मसाल्याचे पदार्थ, मांसाहार, कोल्ड्रिंक्स, मद्यमान हे टाळणे महत्त्वाचे आहे.

अशी घ्या काळजी

* दिवसभर भरपूर पाणी प्यावे. आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.
* फळांचा रस, ताक, सरबत प्राशन करावे. उन्हात डोके आणि चेहरा स्कार्फने, रुमालाने झाकून घ्यावा.
* सनस्क्रीनचा वापर अवश्य करा.
* घट्ट व काळे कपडे घालणे टाळावे. सुती कपडे घालावेत.

हेही वाचा 

Back to top button