वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनच्या वतीने “आम्ही भारतीय: भारतीय आवाज आणि जागतिक ठसा” चर्चासत्र | पुढारी

वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनच्या वतीने "आम्ही भारतीय: भारतीय आवाज आणि जागतिक ठसा" चर्चासत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनच्या वतीने “आम्ही भारतीय : भारतीय आवाज, जागतिक ठसा” हे विशेष चर्चासत्र दिल्लीत पार पडले. ऐतिहासिक कथा राष्ट्रीय अभिमानात कशा प्रकारे योगदान देतात” आणि “काश्मीर: कल्हना से कलंतर तक” या संकल्पनेवरील दोन समूह चर्चेत देशभरातील विचारवंतांनी भाग घेतला. देशाच्या आणि जगाच्या विविध भागांतून ४५० हून अधिक लोक यात सहभागी झाले होते. वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाऊंडेशनच्या प्रकल्प प्रमुख हेमांगी सिन्हा यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनचे संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक सुधांशू मित्तल यांनी मार्गदर्शन केले. तर इंडोनेशियातील गांधीवादी विचारवंत, पद्मश्री ऑगस्ट उदयन यांनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सामायिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांबद्दल सांगितले. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीबद्दल त्यांनी भाष्य केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात भारताच्या विविध भागांतील विविध मान्यवर सहभागी होते. यामध्ये स्वपन दासगुप्ता, प्रसिद्ध पत्रकार आणि राज्यसभा सदस्य, डॉ. मीनाक्षी जैन, इतिहासकार आणि प्राध्यापक पद्मश्री आनंद रंगनाथन आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील जे साई दीपक यांचा समावेश होता. इतिहासाच्या कथनावर नियंत्रण कोणाचे आहे हे समजून घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. मीनाक्षी जैन यांनी व्यक्त केले. जे साई दीपक यांनी चर्चेतील सर्व मुद्दे जोडत निदर्शनास आणले की एकतर्फी ऐतिहासिक कथनांचा मुख्य दोष हिंदू समुदायाची त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीबद्दल उदासीनता आहे. हिंदू समाजाला स्वतःच्या अस्मितेसाठी लढण्यात अपयश आल्याने फुटीरतावादी शक्तींना जात, वंश, प्रदेश इत्यादी विविध शीर्षकाखाली हिंदूंच्या ओळखींचे विभाजन करण्याच्या मुद्द्यावर त्यांचे राजकारण करता आल्याचे ते म्हणाले.

काश्मीरच्या इतिहासावर आयोजित दुसऱ्या चर्चासत्रात जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरचे संस्थापक आशुतोष भटनागर, चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, पत्रकार याना मीर यांनी सहभाग घेतला. आशुतोष भटनागर यांनी राजतरंगिणीमध्ये वर्णन केलेल्या काश्मीरच्या ऐतिहासिक प्रासंगिकतेबद्दल भाष्य केले. तर विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरच्या इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या ऐतिहासिक तथ्यांबद्दल सांगितले. याना मीर यांनी राजतरंगिणीच्या काळात काश्मीरमधील परिस्थिती आणि काश्मीरच्या आधुनिक इतिहासाचे तुलनात्मक विश्लेषण केले.

Back to top button