इचलकरंजीच्या तलाठ्यास लाच घेताना अटक | पुढारी

इचलकरंजीच्या तलाठ्यास लाच घेताना अटक

इचलकरंजी : बक्षीसपत्राने दिलेल्या मालमत्तेची सात-बारावर नोंद करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना इचलकरंजी येथील तलाठी अमोल आनंदा जाधव (वय 39, रा. शहापूर, मूळ रा. कोरवी गल्ली, आगर रोड, शिरोळ) यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. इचलकरंजी येथील रि.स.नं. 452 क्षेत्र 0.0.90 आर. इतकी मिळकत तक्रारदार यांनी रजिस्ट्रर बक्षीसपत्राने 2019 मध्ये नातेवाईकांना दिली आहे. या मिळकतीचे सात-बारापत्रकी नाव नोंद करण्याच्या बदल्यात तलाठी जाधव याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

तलाठी जाधव यास पाच हजारांपैकी चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी राजवाडा चौक येथील तलाठी कार्यालयातच रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी तलाठी जाधव याच्याविरोधात इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला, स.पो.फौ. प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ. अजय चव्हाण, सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, विष्णू गुरव, सूरज अपराध आदींच्या पथकाने केली.

Back to top button