Hasan Mushrif : एकरी उत्पन्न वाढविल्याशिवाय शेती परवडणार नाही : हसन मुश्रीफ | पुढारी

Hasan Mushrif : एकरी उत्पन्न वाढविल्याशिवाय शेती परवडणार नाही : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकरी उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. यासठी कृषी प्रदर्शनामधून मार्गदर्शन व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. (Hasan Mushrif)

मेरी वेदर ग्राऊंडवर भरविण्यात आलेल्या भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चार दिवस चालणार्‍या या प्रदर्शनामध्ये 10 कोटींचा रेडा, सर्वात कमी उंचीची गाय व दीड वर्षाचा 100 किलोचा बोकड आकर्षण आहे.

बदलत्या शेतीची माहिती शेतकर्‍यांना देण्यासाठी प्रदर्शनांची समाजाला गरज आहे. शेतकरी कुटुंबातील मुलं शेतीपासून बाजूला जाऊ लागली आहेत. ही चिंतेची बाब आहे, असे खा. धैर्यशील माने यांनी सांगितले. नवी पिढी शेतीकडे वळावी, यासाठी शाळेपासून मुलांना कृषीसंबंधी शिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे सांगून खा. संजय मंडलिक यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून साखरेला वगळावे, अशी मागणी केली.(Hasan Mushrif)

खा. धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, तंत्रज्ञान व शेती उपयोगी साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेल्या पंधरा वर्षांपासून प्रदर्शन भरविले जात आहे. ग्रामीण भागातील सेवा सोसायटी भक्कम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

कृष्णराज महाडिक यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, माजी आ. अमल महाडिक, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, पृथ्वीराज महाडिक, विजय जाधव, राहुल चिकोडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, राहुल देसाई, संग्राम कुपेकर, अरुंधती महाडिक, रूपाराणी निकम उपस्थित होते. भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आभार मानले.

दुसर्‍या दिवशी अलोट गर्दी

भीमा कृषी प्रदर्शनास शनिवारी अलोट गर्दी झाली. भागीरथी महिला संस्थेमार्फत बचत गटांच्यावतीने 5 हजार झुणका भाकरींचे मोफत वाटप करण्यात आले. प्रदर्शनास खा. धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक, साधना महाडिक, मंगलताई महाडिक, इंद्रजित जाधव आदींनी भेट दिली.

भरड धान्याचा आहारात समावेश करावा : डॉ. योगेश बन

बदलत्या जीवनशैलीमुळे रोग, मधुमेह, पचनाचे आजार वाढत चालले आहेत. यासाठी पौष्टिक भरडधान्यमधील नाचणी, वरी, कोंडा, बार्टी, चीना, ज्वारी, बाजरी आदींचा आहारात समावेश करावा, असे प्रतिपादन डॉ. योगेश बन यांनी व्याख्यानात केले. ‘लम्पी आजार व वंध्यत्व निवारण’ या विषयावर डॉ. सॅम लुद्रिक यांनी, तर ‘पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फायदेशीर’ या विषयावर कृषी महाविद्यालय कोल्हापूचे प्रा. अरुण मराठे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

Back to top button