Devendra Fadnavis: विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीत वीजपुरवठा : देवेंद्र फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis: विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीत वीजपुरवठा : देवेंद्र फडणवीस

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : तुलनेने कमी उद्योग, व्यवसाय असणाऱ्या विदर्भ, मराठवाडा या भागात उद्योग सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबविला जाईल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२७) केले. Devendra Fadnavis

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव, ॲडव्हाँटेज विदर्भ या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत या विचार मंथन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोणताही उद्योग उभारण्यासाठी वीज, पाणी, मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते. केंद्रीय रस्ते, महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचे जाळे मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी पुरवठा साखळी विदर्भात निर्माण झाली आहे. मोठे लॉजिस्टिक क्लस्टर आम्ही नागपूरमध्ये निर्माण करणार आहोत. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढे आणायचे आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपर्यंत होणार आहे.

नागपूरपासून मुंबईप्रमाणे गोवा महामार्ग आम्ही तयार करीत आहोत. त्याला शक्तीपीठ महामार्ग संबोधले जाईल. नागपूरचे नवीन विमानतळ जागतिक मानांकनाचे असेल. अमरावती, अकोला विमानतळाला अद्यावत करणार आहोत. गडचिरोलीमध्येही आमचे विमानतळ तयार होत आहे. चंद्रपूरचेही विमानतळ आम्ही लवकरच पूर्णत्वास नेऊ, त्यामुळे रस्ते लोहमार्ग व विमान मार्गाने नागपूर व विदर्भ प्रत्येक प्रदेशाशी जोडला गेला आहे.

दरम्यान, चार्मोशी पासून ‘वॉटर वे ‘ तेलंगानापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. वैनगंगा ते नळगंगा ५५० किलोमीटरचा कॅनॉल आम्ही तयार करीत आहोत. 2024 मध्ये या कामाला सुरुवात होऊन सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे विदर्भातील जास्तीत जास्त शेतीला पाणी पुरवठा करता येईल.

हेही वाचा 

Back to top button