Nitish Kumar : नितीश यांची एक्झिट इंडिया आघाडीसाठी सुचिन्ह

Nitish Kumar : नितीश यांची एक्झिट इंडिया आघाडीसाठी सुचिन्ह
Published on
Updated on

नवी दिल्ली : नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएचा रस्ता पकडल्याने राजकारणात खळबळ उडाली असली, तरी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मात्र नितीशकुमारांची एक्झिट हे इंडिया आघाडीसाठी सुचिन्ह असल्याचे म्हटले आहे. नितीशकुमार यांच्याबाबत ममतांच्या मनात आधीपासूनच शंका होती. (Nitish Kumar)

बिहारच्या राजकीय उलथापालथीच्या हालचाली दिल्ली आणि पाटण्यात सुरू असताना नितीशकुमार एनडीएमध्ये जाणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. नितीश यांचे बाहेर जाणे हा इंडिया आघाडीला धक्का मानला जात असला, तरी याबाबत ममता बॅनर्जी यांच्या प्रतिक्रियेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजभवनावर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बिहारमध्ये नितीश सरकारबाबत असलेली अँटी इन्कम्बन्सी इंडिया आघाडीला महागात पडली असती. नितीशकुमार महागठबंधनमधून बाहेर पडणे हे काही राजद आणि काँग्रेससाठी नुकसानीचे नाही. उलट नितीश राजदसोबत युती करून लढले असते, तर त्यांना 40 पैकी 6 ते 7 पेक्षा अधिक जागा मिळाल्या नसत्या.

ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या मते, ममता बॅनर्जी यांच्या मनात नितीश यांच्याबाबत कायमच शंका आहे. विरोधकांच्या आघाडीबाबत ते किती कटिबद्ध आहेत याची शाश्वती नसल्यानेच ममता बॅनर्जी यांनी नितीश यांना इंडिया आघाडीचे संयोजक नेमण्याला विरोध केला होता.

हा तर भाजपचा कट

सूत्रांनी म्हटले आहे की, नितीशकुमारांना इंडिया आघाडीचा संयोजक नेमायला लावायचे आणि त्यानंतर त्यांना एनडीएसोबत जोडून घ्यायचे हा भाजपचाच कट होता. ममता बॅनर्जी यांना या भाजपच्या या कटाची पूर्वकल्पना होती म्हणूनच त्यांनी नितीश यांच्या नावाला विरोध केला. तृणमूलच्या वरिष्ठ नेत्याने पुढे सांगितले की, नितीशकुमार यांच्याबाबत ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव हेही सहमत होते.

जागावाटपाबाबत…

इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालच्या जागावाटपाबाबत बोलणी सुरू होण्याआधीच आम्ही त्यांना दोन जागा देण्याची तयारी दर्शवली होती; पण त्यांनी ती नाकारली. आता बंगालात इंडिया आघाडी एकत्र न लढण्याचे खापर काँग्रेसवर फुटणार आहे. (Nitish Kumar)

भाजपला विरोधच करणार

शुक्रवारी बिहारच्या घडामोडी वेगात सुरू झाल्यानंतर पत्रकारांनी ममता बॅनर्जी यांना नितीशकुमार यांच्या जाण्याचा भाजपला फायदा होणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही होवो, आम्ही भाजपला विरोधच करणार, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news