भरदिवसा सराफी पेढी फोडून 25 तोळे दागिने, 7 लाखांची रोकड लंपास | पुढारी

भरदिवसा सराफी पेढी फोडून 25 तोळे दागिने, 7 लाखांची रोकड लंपास

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मध्यवर्ती भाऊसिंगजी रोडवरील सिमंधर ज्वेलर्स या सराफी पेढीत गुरुवारी भरदिवसा चोरी झाली. चोरट्याने 25 तोळे सोन्याचे दागिने, 7 लाखांची रोकड असा 20 लाखांचा ऐवज लंपास केला. सतत वर्दळ असलेल्या रोडवर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. (Crime News)

चोरी करताना बनावट किल्ल्यांचा वापर केल्याने संशयित माहीतगार असावा, असा पोलिसांचा संशय आहे. चोरट्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. लवकरच छडा लावण्यात यश येईल, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह शहरातील अधिकार्‍यांनी पाहणी केली. ठसेतज्ज्ञांसह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (Crime News)

धनराज रामचंद्र जैन, मुलगा जयेश यांची पेढी असून, गुरुवारी दुपारी दीड वाजता दोघेही घरी जेवायला गेले होते. दुपारी तीन वाजता पेढीत आले असता, त्यांना बैठकीच्या ठिकाणी सात लाखांची रोकड असलेली बॅग आढळून आली नाही. तसेच कपाटातील 25 तोळे दागिने लंपास करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

जैन यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. तातडीने धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अधिकार्‍यांनी पाहणी केली. वीस ते पंचवीस वयोगटातील एक तरुण जिन्याला असलेले कुलूप बनावट चावीने उघडून दुसर्‍या मजल्यावर गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोटमाळ्यातून सराफी पेढीमध्ये प्रवेश केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

पेढीतून बाहेर पडताना चोरट्याने 7 लाखांची रोकड आणि 25 तोळ्यांचे दागिने बॅगेत भरून जाताना फुटेजवरून दिसून येते. जुना राजवाडा पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणची यंत्रणाही गुन्ह्याचा समांतर तपास करीत आहे. मध्यवर्ती ठिकाणी आणि भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली आहे.

Back to top button