कोल्हापुरी फोडणीला भेसळीचा ठसका!

कोल्हापुरी फोडणीला भेसळीचा ठसका!
Published on
Updated on

कोल्हापूर, विशेष प्रतिनिधी : मसाल्याच्या विविध पदार्थांमुळे अस्सल कोल्हापुरी जेवणाची लज्जत सातासमुद्रापार पोहोचली आहे; मात्र अलीकडच्या काही वर्षांत या जेवणाच्या फोडणीला भेसळीचा 'ठसका' लागत आहे.

तमालपत्र, बडिशेप, चक्रफूल, मिरे, ओवा, काळाजिरा, दालचिनी, धणे, जिरे, कडिपत्ता, लवंग, वेलदोडा, मेथी, मोहरी, तीळ, चिंच, केशर, खसखस, हळद हे मसाल्याचे पदार्थ म्हणजे कोल्हापुरी जेवणाचे सार आहे. अलीकडील काळात या मसाल्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळत आहे.

तमालपत्र म्हणून जंगली झाडाची पाने गळ्यात मारली जातात. चक्रफुलाच्या नावाखाली भलतेच काहीतरी ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. तेल आणि अर्क काढून घेतलेल्या लवंगा, वेलदोडे आणि मिरे ग्राहकांच्या डोक्यावर वाटण्याचा उद्योग सरेआम सुरू आहे. भेसळीचा ओवा ग्राहकांची पोटदुखी ठरत आहे.

काळाजिरा म्हणून कसल्याही बिया गळ्यात मारल्या जातात. दालचिनी म्हणून भलत्याच झाडाची साल ग्राहकाला चिकटवली जाते. धना किंवा धना पावडरीतील लाकडाच्या भुशाची भेसळ तर 'धन्य धन्य' म्हणावी अशी आहे.

धोतर्‍याच्या बोंडाच्या आतील काळ्या बिया हुबेहुब मोहरीसारख्या दिसतात; पण विषारी असतात. या बिया खाण्यात आल्या, तर माणसाचीच काय, जनावराचीसुद्धा बुद्धी भ्रष्ट होण्याचा धोका असतो. मात्र, बक्कळ पैशामुळे मती भ्रष्ट झालेली मंडळी धोतर्‍याच्या बिया मोहरीत मिसळतात. आता याचा काय परिणाम होत असेल, ते सांगायलाच पाहिजे असे नाही. तिळामध्ये कुर्डू म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनस्पतीच्या शिजवलेल्या बिया मिसळल्या जात आहेत. केशर म्हणून मक्याच्या कणसावर तरंगणारे तुरे ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत.

खसखशीत गव्हाचा रवा आणि हळदीत चक्क खडूची पावडर किंवा पिवळ्या रंगाचा वापर केला जात आहे. मसाल्याच्या पदार्थांमधील या असल्या भेसळीमुळे अस्सल कोल्हापुरी जेवणाची लज्जत हळूहळू बेचव होताना दिसत आहे.

अशी ओळखा मसाल्यातील भेसळ

धना पावडर खरी असेल, तर पाण्यावर तरंगते आणि लाकडाचा भुसा बुडतो. जिरे हातावर चोळताच काळे पडले, तर शंभर टक्के बोगस. अर्क आणि तेळ काढलेल्या मिरीला रॉकेलसारखा वास येतो आणि ते प्रमाणापेक्षा जास्त चमकतात. भेसळीच्या हळद पावडरीत पाच थेंब हायड्रोक्लोरीक अ‍ॅसीड आणि पाच थेंब पाणी टाकले की, त्याला वांग्यासारखा वास येतो. असली हळद खाणे म्हणजे कर्करोगाला हमखास निमंत्रण. दालचिनी हातावर रगडल्यावर त्याचा रंग आणि वास तुमच्या हाताला लागला तरच ती अस्सल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news