हद्दवाढीसह कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध : राजेश क्षीरसागर | पुढारी

हद्दवाढीसह कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध : राजेश क्षीरसागर

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी, रंकाळ्यासाठी 20 कोटी, कन्व्हेंक्शन सेंटरसाठी 243 कोटी, राजर्षी शाहू समाधिस्थळासाठी 10 कोटी, राजाराम बंधारा नवीन पुलासाठी 17 कोटी, मूलभूत सुविधांसाठी 15 कोटी, गांधी मैदानासाठी 5 कोटी यासह विविध कामे आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली आहे. यापुढे हद्दवाढीसह कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दै. ‘पुढारी’बरोबर बोलताना दिली.

टप्प्याटप्प्याने हद्दवाढ

क्षीरसागर म्हणाले, सन 1946 पासून कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्याला काही लोकप्रतिनिधींचा राजकीय स्वार्थ कारणीभूत ठरत आहे. मात्र, त्यामुळे कोल्हापूरचा विकास खुंटला आहे. परंतु, हद्दवाढ झाल्याशिवाय शहराची प्रगती होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत असून, लवकरच त्याला यश येईल. शहर परिसरातील गावांची टप्प्याटप्प्याने हद्दवाढ करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

खंडपीठासाठी प्रयत्न

कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकचा केंद्रबिंदू आहे. कोल्हापुरात सर्व सोयीसुविधा आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबरोबर बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापुरात खंडपीठ स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

विकासकामे पूर्ण करण्याकडे कल…

गेल्या काही वर्षांत कोल्हापूरच्या राजकारणाने वेगळी दिशा पकडली आहे. पूर्वी निवडणुकीपुरते असणारे आरोप-प्रत्यारोप रोजच होऊ लागले आहेत. प्रसिद्धीपोटी बिनबुडाचे आरोप करणारे टोळके सध्या कार्यरत आहे. त्यांच्या आरोपांकडे गांभिर्याने लक्ष न देता विकासाचे काम पूर्ण करण्याकडे आपला कल आहे. परंतु, विकासकामांच्या आड येऊन जनतेची दिशाभूल करणार्‍या टोळक्यास जनतेने ओळखले असून, आगामी काळात त्या टोळक्यास जनताच चोख उत्तर देईल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

उद्योग, आय.टी.च्या माध्यमातून रोजगारास प्राधान्य

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 20ी47 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे मुख्य ध्येय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे. देशाच्या सकल उत्पन्नामध्ये (जीडीपी) राज्याचा वाटा 18 टक्के आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना झाली. यामध्ये उपाध्यक्ष पदावर माझी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी काम करण्याची संधी मिळणारा राज्यातील तीन नंबरचा प्रमुख व्यक्ती म्हणून संधी मिळाली हे भाग्य समजतो. राज्याचा विकास साधण्यासाठी मोठी जबाबदारी आहे. या संस्थेच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक काम करून राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे माझ्यासाठी मोठी संधी आहे. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र, आय.टी. क्षेत्रांत प्रगती करून युवकांसाठी रोजगार निर्मितीची संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

कोल्हापुरात फुटबॉल अ‍ॅकॅडमीचे ध्येय…

कोल्हापूर ही कलानगरीसह क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. कोल्हापूरचा फुटबॉल जगप्रसिद्ध आहे. अशा फुटबॉलवेड्या शहरात राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून लाखो रुपयांची बक्षिसे देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले जाते. वर्षभर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, हॉकीसह विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा आराखडा सादर केला आहे. युद्धपातळीवर त्याचा पाठपुरावा सुरू असून, कोल्हापुरात फुटबॉल अ‍ॅकॅडमी उभारणे हे प्रमुख ध्येय असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button