‘दालमिया’च्या राखेमुळे शेतीची राखरांगोळी! | पुढारी

‘दालमिया’च्या राखेमुळे शेतीची राखरांगोळी!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दालमिया कारखाना आणि डिस्टिलरीच्या धुराड्यातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे या परिसरातील अवघ्या शेतीचीच जणू काही राखरांगोळी होताना दिसत आहे. केवळ या राखेमुळे या भागातील शेतकर्‍यांना वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे.

आसुर्ले, पोर्ले, केर्ले, केर्ली, पडवळवाडीसह आजूबाजूच्या गावांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड होत होती. उसामध्येसुद्धा अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून भाजीपाला, मका व अन्य पिकांची लागवड करीत होते. या माध्यमातून या भागातील शेतकर्‍यांना वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, दालमिया कारखाना आणि कारखान्याच्या डिस्टिलरीच्या धुराड्यातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे या भागातील भाजीपाल्याची शेती लयाला गेली आहे.

कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोथिंबीर, मेथी किंवा अन्य कोणताही भाजीपाला करणे आता अशक्य होऊन बसले आहे. या कारखान्यातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे भाजीपाल्याची पिके सुरुवातीपासूनच काळवंडायला सुरुवात होते. फ्लॉवर केला तर त्याचे गड्डेच्या गड्डे काळेकुट्ट होऊन जातात. अन्य भाजीपाला पिकांवरही दालमिया कारखान्यातून बाहेर पडणार्‍या राखेची काळी छाया दाटून येते. त्यामुळे अशा भाजीपाल्याकडे बाजारात कुणी ढुंकूनही पाहत नाही. लागवड करणारे लोकही असला भाजीपाला खाण्याचे धाडस करीत नाहीत. त्यामुळे या भागातील लोकांनी भाजीपाला करणेच सोडून दिले आहे. परिणामी, या भागातील शेतकर्‍यांना दालमिया कारखान्याच्या अवकृपेमुळे आपल्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. वास्तविक पाहता, या नुकसानीला जबाबदार असलेल्या दालमिया कारखान्याकडून ही नुकसानभरपाई वसूल करण्याची गरज आहे.

केवळ भाजीपालाच नव्हे, तर अन्य पिकांवरही दालमियाची काळी छाया सदासर्वकाळ दाटून आलेली दिसते. अनेकवेळा उसाच्या सुरळीमध्ये राख जाऊन उसाची वाढ खुंटलेली दिसते. गहू आणि भातासारखी पिकेही या राखेमुळे वेगवेगळ्या रोगांना बळी पडताना दिसत आहेत. पर्वी या भागात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; मात्र आजकाल दालमियाच्या राखेच्या धास्तीमुळे कारखान्याचा गळीत हंगाम बंद झाल्याशिवाय शेतकरी मक्याची लागवड करण्याचे धाडस करीत नाहीत. मात्र, कारखाना बंद झाला तरी डिस्टिलरी मात्र वर्षभर सुरूच असते. त्यातून बाहेर पडणारी राख पाठ सोडायला तयार नाही.

दालमिया कारखान्याच्या या राखेबद्दल या भागातील शेतकर्‍यांनी आजपर्यंत अनेकवेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच या तक्रारींकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत आलेले आहे. आता मात्र या भागातील शेतकर्‍यांचा संयम संपत आला आहे. एकदाचा काय तो या राखेचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी या भागातील शेतकरी सामुदायिक उठाव करण्याच्या तयारीत असल्याचे आढळून येत आहेत.

कारखान्याला शेतकर्‍यांबद्दल नाही आपुलकी!

अन्य कारखान्यांप्रमाणे हा कारखाना स्थानिक लोकांचा नाही, तो आज बाहेरून आलेल्या एका खासगी कंपनीच्या ताब्यात आहे. त्यामुळे या लोकांना स्थानिक शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल कोणतीही आपुलकी नाही. कारखान्याकडून सध्या जे काही प्रदूषण होत आहे, त्याबद्दल आम्ही कारखाना व्यवस्थापनाशी बोलत आहोत. लवकरच संघटना ठोस निर्णय घेईल.

– एन. डी. चौगुले, रयत क्रांती संघटना

Back to top button