दसरा चौकातून रणशिंग | पुढारी

दसरा चौकातून रणशिंग

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजास आरक्षण दिले नाही तर मराठ्यांनी गनिमी कावा केल्यास सरकारला सोसणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकात मशाल प्रज्वलित केल्यानंतर बोलताना विविध वक्त्यांनी हा इशारा दिला.

मराठा समाजास टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसह मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे रविवारी दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या सर्व संघटनांच्या नेत्यांनी मशाल पेटवून या आंदोलनाचे रणशिंग फुंकले व साखळी उपोषणास प्रारंभ झाला. या आंदोलनात मराठा समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आता क्रांतीची मशाल पेटली आहे. मराठ्यांनी आंदोलनाची घोडदौड सुरू केली असून मराठ्यांचा गनिमी कावा शासनाला कळणार नाही. सरकारने आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा हा वणवा पेटणार आहे.

अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, सरकारने मराठा समाजाचा सातत्याने विश्वासघात केला. त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून आम्ही मशाल पेटवली आहे. या मशालीत शासनाची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात अंधारातून आले आणि पळून गेले. आरक्षणाचा वणवा पेटल्यानेच मुख्यमंत्र्यांवर अशी गुपचूप येण्याची वेळ आली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गेली आठ महिने शासन केवळ आश्वासन देत आहे. आता शासनावर विश्वास राहिलेला नाही. जरांगे-पाटील हे मरणाच्या दारात आहेत. तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही. लोकप्रतिनिधींना कोल्हापूर शहर बंदी केलेली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही.

रूपेश पाटील म्हणाले, आरक्षण देतो म्हणणे आणि प्रत्यक्षात देणे यामध्ये फरक आहे. नेते मंडळींचा दिखाऊपणा सुरू आहे. मराठा कुणबीच आहे. आता नेत्यांना केवळ विरोध सुरू आहे, उद्या त्यांच्या गाड्या फोडल्या जातील. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळायला पाहिजे. जरांगे-पाटील यांचे उपोषण महाराष्ट्र वाया जाऊ देणार नाही.

या आंदोलनात विजय देवणे, दिलीप देसाई, आर. के. पोवार, अ‍ॅड. सुरेश कुराडे, बाबा पार्टे, मोहन सुर्वे, शशिकांत पाटील, ईश्वर परमार, सुभाष जाधव, संजय जाधव, काका जाधव, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, शाहीर दिलीप सावंत, उदय लाड, अनुप पाटील, अमर निंबाळकर, संजय पवार, विजय घाटगे निंबाळकर, संजय काटकर, किरण पडवळ, प्रा. अनिल घाटगे, संपत पाटील, रूपेश पाटील, सुरेश पाटील, युवराज उलपे, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, रेखा पाटील, अंजली जाधव, बबिता जाधव, रुपाली बरगे, मालती दुर्गुळे, रेशमा पवार, भारती पोवार, सरलाताई पाटील, अनिता टिपुगडे, राजशेखर तंबाखे, शंकर शेळके, किशोर खानविलकर, सुनील कानूरकर, उत्तम वरुटे, संभाजी इंगळे, अरुण यादव, दीपक मुळीक, रघुनाथ नढाळे, संपतराव चव्हाण पाटील, प्रसन्न शिंदे यांच्यासह मराठा समाजातील सर्व संघटना आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Back to top button