कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ने निमशिरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टर पेटविला | पुढारी

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ने निमशिरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टर पेटविला

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा :  चिपरी (ता. शिरोळ) येथील आधुनिक गुर्‍हाळघराने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली. यामुळे कोल्हापूर-सांगली मार्गावर निमशिरगाव (ता. शिरोळ) फाट्यावर उसाची वाहतूक सुरू असताना मंगळवारी रात्री ‘स्वाभिमानी’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 400 रुपयांच्या दुसर्‍या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आठवड्यापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. तसेच अधिकचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी उसाची वाहने अडवून ट्रॅक्टरचालकांना जाब विचारला. त्याचबरोबर उसाचा दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी होऊ देणार नाही तसेच वाहतूक करू देणार नाही, अशी भूमिका घेत काही वाहनांतील हवा सोडली.

Back to top button