प्रत्यक्ष कर महसुलाच्या उद्दिष्टासाठी हालचाली! | पुढारी

प्रत्यक्ष कर महसुलाच्या उद्दिष्टासाठी हालचाली!

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : केंद्राच्या तिजोरीत प्रत्यक्ष कराच्या रूपाने जमा होणार्‍या महसुलाची रक्कम अंदाजापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. यामुळे चालू अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कराच्या रूपाने जमेत धरण्यात आलेल्या महसुलाच्या अपेक्षित रकमेचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.

पहिल्या सहामाहीत 53 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यंदा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष कराच्या रूपाने 18 लाख 23 हजार कोटी रुपयांचा कर जमा होईल, असे अपेक्षित असले, तरी कर भरण्याचा वेग पाहता नवे वाढीव उद्दिष्ट निर्धारित करण्याची वेळ आली आहे. या स्थितीने देशाची अर्थव्यवस्था सुद़ृढतेकडे प्रवास करीत असल्याकडे निर्देश केला असून, अप्रत्यक्ष कराच्या उद्दिष्टालाही वाढीव उद्दिष्टाची जोड द्यावी लागेल, असे चित्र आहे.

भारतीय अर्थसंकल्पात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या रूपाने जमा होणारा महसूल अर्थकारणाच्या जमेच्या बाजूचा कणा समजला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्राने 18 लाख 23 हजार कोटींचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. तथापि, 2023-24 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 9 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष कराच्या रूपाने शासनाच्या तिजोरीत 11 लाख 7 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या याच कालावधीत जमा झालेल्या गतवर्षीच्या महसुलाच्या तुलनेत ही वाढ 17.95 टक्क्यांची आहे. यामधील करदात्यांना दिलेल्या 1 लाख 50 हजार कोटी रुपयांची परताव्याची रक्कम वजा जाता केंद्राच्या तिजोरीत प्रत्यक्ष कराचा निव्वळ महसूल 9 लाख 57 हजार कोटी रुपये इतका आहे.

दमदार झेप

पहिल्या सहा महिन्यांतच महसुलाने आपल्या सहामाही उद्दिष्टाच्या पुढे दमदार झेप घेतली आहे. आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या आणि शेवटच्या तिमाहीमध्ये जमा होणार्‍या महसुलाचा आजवरचा आढावा घेतल्यास यंदा केंद्राने अपेक्षित धरलेले प्रत्यक्ष कराचे उद्दिष्ट लिलया पूर्ण होईल, असे चित्र आहे. यामुळेच नव्या उद्दिष्टांसाठी हालचालींना प्रारंभ झाला आहे.

Back to top button