मुलीला भेटून परतणार्‍या वडिलांचा अपघातात मृत्यू; आई गंभीर जखमी | पुढारी

मुलीला भेटून परतणार्‍या वडिलांचा अपघातात मृत्यू; आई गंभीर जखमी

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : कुरळप-मांगले रस्त्यावरील डोंगरवाडी फाट्याजवळ भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बाळासो महादेव केकरे (वय 55) ठार झाले तर त्यांच्या पत्नी भारती बाळासो केकरे (50, दोघे रा. आनंदनगर कोडोली, ता. पन्हाळा) या गंभीर जखमी झाल्या. मुलीला भेटून गावाकडे परतत असताना रविवारी दुपारी एकच्या दरम्यान हा उपघात झाला.

याबाबतची माहिती अशी, डोंगरवाडी येथे राहणार्‍या मुलीस भेटण्यासाठी बाळासो केकरे पत्नी भारतीसह दुचाकीवरून गेले होते. मुलगी व नातवांना भेटूनकोडोलीकडे येत असताना कुरळप-मांगले रस्त्यावरील डोंगरवाडी फाट्याजवळ कुरळपकडून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेतकेकरे दाम्पत्य सुमारे 25 फूट रस्त्यावरून फरफटत गेले. बाळासो यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडले; तर भारती यांच्या डाव्या पायाला मोठी दुखापत झाली.

यावेळी शेतामध्ये काम करणार्‍या शेतकर्‍यांनी या दोघांना उपचारासाठी तातडीने कोडोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण बाळासो यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भारती यांच्यावर कोडोली येथील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बाळासो केकरे यांच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली.

Back to top button