Kolhapur Crime News : इचलकरंजी अपहरण प्रकरणातील फरार जर्मनी गँगचा म्होरक्या सांगलीत जेरबंद | पुढारी

Kolhapur Crime News : इचलकरंजी अपहरण प्रकरणातील फरार जर्मनी गँगचा म्होरक्या सांगलीत जेरबंद

यड्राव : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी व्यावसायिक अपहरण प्रकरणातील कुख्यात जर्मनी गँगचा म्होरक्या व महिन्यापासून पोलिसांच्या विविध पथकांना चकवा देणारा गुंड आनंदा उर्फ आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय 26, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याला शहापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून ताब्यात घेतले. त्याला आज अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली.  याप्रकरणी शहापूर पोलिसांनी 15 पैकी 13 संशयितांना यापूर्वी अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर एक अल्पवयीन आहे. आनंदा याच्याकडून 19 तोळे सोने, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यासह मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान  आहे. (Kolhapur Crime News)

शहापूर येथील रियल इस्टेट व्यावसायिक सरदार अमिन मुजावर यांना महिन्यापूर्वी कोयत्याचा धाक दाखवून अपहरण करून, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जर्मनी गँगच्या टोळीने साडे 19 तोळे सोन्यासह चार लाख रुपये रोख असा एकूण 11 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली होती. फिल्मी स्टाईलने घडलेल्या या घटनेने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली होती. (Kolhapur Crime News)

या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आनंदा जर्मनी हा महिना भरापासून पोलिसांना चकवा देत होता. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तो सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे असल्याचे गुन्हे शोध पथकास समजले. त्यानुसार त्यांनी विटा पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. आनंदा हा व्हॉट्सअॅप कॉलिंगवरून आपल्या सहकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधत होता. त्यामुळे त्याचे नेमके लोकेशन मिळणे अवघड बनले होते. गुन्हा घडल्या तारखेपासून तो कराड, निपाणी, शिर्डी, गोवा, मुंबई आदी ठिकाणी फिरत होता. त्याने वेळोवेळी मोबाईल सिम कार्ड ही बदलली आहेत. पत्नीला बोलावून घेऊन त्याने गोवा टूरही पार पाडली, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली.

यादरम्यान, पोलिसांना त्याचे ज्या ज्या ठिकाणचे लोकेशन मिळेल, तिथे जाऊन पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच तेथून तो निघून जात असल्यामुळे त्याने पोलिसांना आपल्यामागून राज्यभर फिरवले. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांनी रोख रकमेसह सोने आनंदा यांच्याकडे दिल्याचे सांगितले होते. त्यानुसार आनंदा याच्याकडून सोन्यासह रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त करून करता करविता धनी असलेल्या मुख्य सूत्रधारापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार असल्याचे साळवे यांनी सांगितले.

दरम्यान यापूर्वी गुन्ह्यासाठी वापरलेली चार चाकी,  1 बाईक , 3 मोटरसायकली चार कोयते, 2 मोबाईल व 32 हजार नऊशे रूपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Kolhapur Crime News : जर्मनी टोळीतील पाच संशयितांवर विविध पोलीस ठाण्यामध्ये 23 गुन्हे दाखल

इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळीतील पाच संशयितांवर विविध पोलीस ठाण्यामध्ये 23 गुन्हे दाखल आहेत. रुपेश नरवाडे याच्यावर शिवाजीनगर, गावभाग पोलीस ठाण्यात पाच, आनंद जाधव उर्फ जर्मनी याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकरा,  मेहबूब उकली व अरबाज शेख याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, राजू उर्फ चिन्या सूर्यवंशी याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच असे एकूण 23 गुन्हे दाखल आहेत. तर आनंद जर्मनी व अरबाज शेख याच्यावर मोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

हेही वाचा 

Back to top button