कोल्हापूर : ‘बिद्री’ सहविज प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट विशेष पुरस्कार जाहीर | पुढारी

कोल्हापूर : 'बिद्री' सहविज प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट विशेष पुरस्कार जाहीर

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाला को – जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने सन २०२२ – २३ सालाकरीता सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील वर्षीही कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट को-जनरेशन प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराने सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून देशपातळीवर कारखान्याचा सलग दुसऱ्या वर्षी सन्मान होत असून कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा यशस्वी मोहोर उमटली आहे.

को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने को-जनरेशन प्रकल्प राबविणाऱ्या आदर्शवत संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित केले जाते. सहकार क्षेत्रातील प्रकल्पांतर्गत बॉयलर ८७ कि.ग्रॅ. सेमी स्क्वेअर पेक्षा जास्त क्षमता गटामधून सन २०२२ – २३ चा उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प हा विशेष पुरस्कार ‘ बिद्री ‘ ला मिळाल्याचे तसेच वैयक्तीक गटातून कारखान्याचे प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर यांना बेस्ट को-जनरेशन मॅनेजर हा पुरस्कार जाहिर झाल्याचे महासंचालक संजय खताळ यांनी पत्राद्वारे कारखाना प्रशासनाला कळविले आहे.

येत्या १६ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात को – जनरेशन असोसिएशनच्यावतीने कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि को-जन इंडियाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. यावेळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याने कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व सर्वच संचालक मंडळ, प्रशासन, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी, आदींचे कारखाना कार्यक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट को – जनरेशन पॉवर प्लांटचा गेल्यावर्षी प्रथम क्रमांकाचा तर यंदा विशेष पुरस्कार मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी असा पुरस्कार मिळविणारा बिद्री कारखाना हा देशातील एकमेव असून यामुळे सहवीज प्रकल्पाच्या यशस्वितेवर यांमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. हा पुरस्कार कारखान्याचे सन्मानीय सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना अर्पण करण्यात येत आहे
– मा. आ. के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना

Back to top button