कोल्हापूर : इचलकरंजीत शाळकरी मुलांच्या वादात पालकाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : इचलकरंजीत शाळकरी मुलांच्या वादात पालकाचा मृत्यू

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : शाळकरी मुलांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान पालकांच्या वादावादीत झाले. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये सद्दाम सत्तार शेख (वय 27, रा. स्वामी मळा, इचलकरंजी) या पालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोले मळ्यातील पं.जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर परिसरात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) याच्यासह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, या घटनेनंतर शेख यांच्या नातेवाईकांनी संशयिताच्या घराच्या दारावर लाथा मारत बाहेर ठेवण्यात आलेले बॅरेल व अन्य साहित्य विस्कटून टाकले. त्यामुळे भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : सद्दाम शेख याचा मुलगा आणि शब्बीर गवंडी याचा भाचा हे दोघेही महापालिकेच्या पं.जवाहरलाल नेहरू विद्यामंदिरमध्ये शिकतात. गवंडी यांची बहीण सलमा आलासे यांच्या मुलाने शेख यांच्या मुलास मारहाण केली होती. शेख हा सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी शाळेत आला.

मारहाण झाल्याचे समजताच शेख याने आलासे यांच्या मुलास कानफटीत मारली. याचदरम्यान सलमा आलासे आल्या. मुलास मारहाण झाल्याचे समजताच त्यांनी भाऊ शब्बीर गवंडी याला बोलावून घेतले. मुलाला मारहाणीचा जाब विचारत असतानाच शेख आणि गवंडी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यातूनच दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत व मारहाणीत शेख अचानकपणे जमिनीवर कोसळला. नातेवाईकांसह त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. शेख हा टेम्पोचालक होता. त्याच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. अधिक तपास उपनिरीक्षक काशीद करीत आहेत.

Back to top button