कोल्हापूर : हातकणंगले येथे भरधाव टँकर टपरीत घुसला | पुढारी

कोल्हापूर : हातकणंगले येथे भरधाव टँकर टपरीत घुसला

हातकणंगले : पुढारी वृत्तसेवा : भरधाव दुधाच्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर चहा टपरीमध्ये घुसला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता घडली. सुदैवाने टपरीमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापूर – सांगली मार्गच्या अपुऱ्या व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा अपघात झाला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.

चालक पंढरीनाथ यादव ( मूळगाव उत्तर प्रदेश, सध्या रा. सांताक्रूझ, मुंबई) हा दुधाचा टँकर (GJY21-4740) घेऊन जयसिंगपूरहून नाशिककडे गुरुवारी रात्री निघाला होता. तो पहाटे दोन वाजता हातकणंगले (इचलकरंजी फाटा) येथे आला असता समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात रस्त्याकडील खडयात मोठ्या दगडावर आदळला. व तसाच पुढे टपरीत शिरला. यात टपरीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

सांगली -कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, बिअर बार, इतर व्यवसायांबरोबर टपऱ्यांची रेलचेल आहे. रस्त्याची दुवस्थाही झाली आहे. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. सध्या सांगली -कोल्हापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देऊनही अद्याप रस्ता दुरुस्त झाला नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे.

…तर मोठा अनर्थ घडला असता

सांगली- कोल्हापूर या गजबजलेल्या रस्त्यावर दुतर्फा नागरिकांची गर्दी असते. सलगरे हॉटेलमध्ये कायमच गर्दी असते. जर दिवसा ही घटना घडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता.

हेही वाचा 

Back to top button