विद्यार्थ्यांना दिलासा! करवीर तहसील कार्यालयाकडील प्रलंबित दाखले उद्या मिळणार | पुढारी

विद्यार्थ्यांना दिलासा! करवीर तहसील कार्यालयाकडील प्रलंबित दाखले उद्या मिळणार

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तहसील कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले देण्यात येतात. करवीर तहसील कार्यालयातून दाखले मिळण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. करवीर तालुक्यातून बाराशे दाखले प्रलंबित आहेत. फिफो हा ऑप्शन काढल्यामुळे आता दाखले देणे सोयीस्कर होईल, उद्या (सोमवार) सकाळ पर्यंत अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दाखले मिळतील, असे करवीर कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

सद्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची घाई आहे. अकरावीसह विविध विद्या शाखांमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रहीवास, उत्पन्न, कास्ट, नॉन क्रिमीलेअर, एसइसी दाखला असे विविध दाखले लागतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘फिफो’ ही दाखला देण्याची पद्धत आली. काही कारणाने एखादा दाखला प्रलंबित राहिला तर पुढील सर्व दाखले देण्यात दिरंगाई होत आहे. साधारण प्रक्रिया असलेल्या दाखल्यांसाठीही जास्त कालावधी लागत आहे. दाखले मिळण्यास उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

दाखल्यांची सर्व प्रक्रिया संगणकीकृत झाली आहे. महा-ई-सेवा केंद्र मध्ये दाखल्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तो तहसीलदार कार्यालयातील काही डेस्कवर फिरून नायब तहसीलदारांकडे मंजुरीसाठी जातो. कधी वीज पुरवठा नाही, कधी सर्वर डाऊन तर कधी अन्यकारणाने दाखले मिळण्यामध्ये दिरंगाई होत होती. सोमवार ते बुधवार अनेक वर्गांमध्ये प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यास शेवटची मुदत आहे. यामुळे चौकशीसाठी तहसील कार्यालयात लोकांची गर्दी वाढत आहे. जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात नसून तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागत असल्याचे तहसीलदार यांनी स्पष्ट केले आहे.

करवीर तालुक्यातील अनेक दाखले फिफो ही प्रणाली लागू केल्यामुळे प्रलंबित राहिले होते. काही वेळा सर्वर डाऊनचा परिणाम दाखले प्रलंबित राहण्यासाठी होत होता. शनिवारी फिफो प्रणाली थांबवण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ७०० हून अधिक दाखले पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील इतर प्रलंबित दाखले रविवारी पूर्ण करून सोमवारी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दाखले मिळतील.
– स्वप्निल रावडे (तहसीलदार, करवीर)

हेही वाचा : 

Back to top button